अर्थसंकल्पात देशातील सात कोटी विकलांग दुर्लक्षितच -शंकरबाबा पापळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:37 PM2018-02-03T12:37:25+5:302018-02-03T12:37:36+5:30
शुक्रवारी वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशभरातील सात कोटी विकलांगांची घोर निराशा करण्यात आली, अशी तिखट प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशभरातील सात कोटी विकलांगांची घोर निराशा करण्यात आली, अशी तिखट प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली आहे. देशात एवढ्या मोठ्या संख्येने असलेला हा घटक आज विपन्नावस्थेत जीवन जगत आहे. सरकारकडून यावेळी बजेटमध्ये काही ठोस तरतूद आपल्यासाठी होईल अशी त्यांना आशा होती पण यावेळीही त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली. विशेष म्हणजे दीनदलितांचे कैवारी म्हणविणारे नेते, समाजसेवक यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही याबद्दल पापळकर यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.
मागे विकलांगांना कर्ज देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारने योजना आणली होती पण, अशा योजनांनी त्यांच्या समस्या सुटणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. या उपेक्षित घटकासाठी महाराष्ट शासनाने नोकरीत १ टक्का आरक्षण जाहीर केले आहे, पण राज्यातील त्यांची संख्या पाहता जेमतेम १० हजारांनाही नोकरी मिळणार नाही असे वास्तवही पापळकर यांनी मांडले.