सत्र न्यायालयातून निर्दोष सुटलेल्या आठपैकी सात आरोपींना उच्च न्यायालयात जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:11 AM2021-02-17T04:11:39+5:302021-02-17T04:11:39+5:30
नागपूर : अकोला येथील सुनील धाेपेकर खून प्रकरणामध्ये सत्र न्यायालयातून निर्दोष सुटलेल्या आठपैकी सात आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...
नागपूर : अकोला येथील सुनील धाेपेकर खून प्रकरणामध्ये सत्र न्यायालयातून निर्दोष सुटलेल्या आठपैकी सात आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, या आरोपींवर एकूण पाच लाख रुपये दंड ठोठावून ही रक्कम मृताच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून अदा करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
विवेक प्रकाश इंगळे (३३), सतीश गुलाब खंडारे (३४), सागर रामराव उपरवाट (२९), नीतेश गुलाब खंडारे (३०), कुणाल शिवचरण तायडे (३२), अक्षय मोहन घुगे (३७) व शुभम शेषराव खंडारे (३२), अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. आठवा आरोपी गजानन काशीनाथ कांबळे (४६) याचे निर्दोषत्व उच्च न्यायालयाने कायम ठेवले. मृताचे पूर्ण नाव सुनील ऊर्फ छोटू नारायण धाेपेकर होते. ते जयराज वाईन बारमध्ये व्यवस्थापक होते. ५ मार्च २०१८ ला सत्र न्यायालयाने रेकॉर्डवर ठोस पुरावे नसल्याचे कारणावरून प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडले होते. त्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा सुधारित निर्णय दिला. राज्य सरकारच्या वतीने ॲड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.
--------------------
अशी घडली घटना
१२ ऑगस्ट २०१४ रोजी आरोपी सतीश खंडारे, उपरवाट व इतर चार जणांनी जयराज बारमध्ये जाऊन ३,८७० रुपयाची दारु व खाद्यपदार्थ खरेदी केले. त्यानंतर आरोपींनी लगेच बिल देण्यास नकार दिला. रक्कम उधार ठेवण्यास सांगितले. त्यावरून मृत सुनील धाेपेकर व इतर बार कर्मचाऱ्यांचा आरोपींसोबत वाद झाला. दरम्यान, आरोपी धोपेकर यांना पाहून घेण्याची धमकी देऊन निघून गेले. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी आरोपींनी सुनील धाेपेकर यांना लोखंडी पाईप व काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.