सात तास मेडिकलची लाइट गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:19+5:302021-03-15T04:09:19+5:30
नागपूर : मेडिकलमध्ये रविवारी वीज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने तब्बल सात तास वीज नव्हती. सकाळी १० वाजता गेलेली ...
नागपूर : मेडिकलमध्ये रविवारी वीज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने तब्बल सात तास वीज नव्हती. सकाळी १० वाजता गेलेली वीज सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान परतली. याचा सर्वाधिक फटका कोरोना वॉर्डातील रुग्णांना बसला. या वॉर्डातील दारे -खिडक्या बंद असल्याने व जनरेटरवरील फॅन व लाइटही बंद असल्याने रुग्णांची गैरसोय झाली. उखाडा असह्य झाल्याने अखेर रुग्णांना एकत्र येऊन डॉक्टरांना काही खिडक्या सुरू करण्याची विनंती करावी लागली.
मेडिकलमध्ये विजेचे कंट्रोलर पॅनल जुने झाल्याने ते बदलण्यासाठी सात दिवसांपूर्वी मेडिकलच्या विद्युत विभागाने वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला पत्र देऊन रविवारी सहा ते सात तासांसाठी वीज खंडित करण्याची परवानगी मागितली होती. त्यांच्या परवानगीने आज सकाळी १० वाजेपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. यादरम्यान वॉर्ड क्र १ पासून ते वॉर्ड क्र. ३१ पर्यंत वीज नसल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक वॉर्डात जनरेटरवर असलेले दोन फॅन व लाइट सुरू होते. यामुळे कुठे तक्रार नव्हती. मात्र, कोरोनाबाधितांसाठी असलेल्या वॉर्ड क्र.१२मधील जनरेटवरील फॅन व लाइट सुरू करण्यास तक्रार करूनही कोणीच आले नाही. येथील एका रुग्णाने ‘लोकमत’ला सांगितले, दारे-खिडक्या बंद असल्याने उखाडा वाढला होता. अखेर सर्व रुग्णांनी मिळून काही खिडक्या उघडण्याची विनंती डॉक्टरांना केली. सायंकाळी पाऊणे सात वाजता वीज आली. वॉर्डात स्वच्छता आहे. येथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी मदतीसाठी तत्पर असतात. जेवणही चांगले असते. मात्र, पहिल्यांदाच आज गैरसोय झाली.
कोट...
विजेच्या दुरुस्तीच्या कामामुळे वीज खंडित करण्यात आली होती. अतिदक्षता विभाग व आकस्मिक विभागात वीज होती. इतर सर्व वॉर्डांत वीज नव्हती; परंतु तिथे जनरेटरवर काही फॅन व लाइट सुरू होते. जिथे बंद असल्याच्या तक्रारी होत्या तिथे ते सुरू करण्यात आले.
-डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल