नागपुरात सात लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:26 AM2019-10-19T00:26:22+5:302019-10-19T00:28:32+5:30
अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यतेल विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत सात लाख नऊ हजार रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यतेल विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत सात लाख नऊ हजार रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला.
प्राप्त माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी विशेष मोहिमेंतर्गत मस्कासाथ, इतवारी, चिखली ले-आऊट येथील येनूरकर ट्रेडिंग कंपनी, दिनेश ट्रेडिंग कंपनी, जय गणेश ट्रेडर्स, मोतीयानी ब्रदर्स, उदय ट्रेडिंग कंपनी, महालक्ष्मी ट्रेडर्स, शक्ती ऑईल ट्रेडर्स, शंकर ऑईल स्टोअर्स, किशनानी ट्रेडिंग कंपनी या विक्रेत्यांची तपासणी केली. या विक्रेत्यांकडे टिनाच्या डब्यांचा पुनर्वापर व भेसळीच्या संशयावरून रिफाईन्ड सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल, ब्लेंडेड एडिबल व्हेजिटेबल तेल, रिफाईन्ड पामोलिन तेल, मोहरी तेल कच्ची घाणी, बेसन व मैदा या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले. या विक्रेत्यांकडून २.६५ लाखांचे ३१४५ किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल (खुले), २.२५ लाख किमतीचे २६३३ किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल, ४२ हजारांचे ३७३ किलो शेंगदाणा तेल, १.७७ लाखांचे १७६८ किलो कच्ची घाणी मोहरी तेल (शक्ती), असा एकूण सात लाख नऊ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. या साठ्यातून एक-एक नमुना घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. नमुन्याच्या विश्लेषणानंतर अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ( दक्षता) अभय देशपांडे आणि नागपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी, आनंद महाजन, विनोद धवड, प्रफुल्ल टोपले, अनंत चौधरी, अमितकुमार उपलप, स्मिता बाभरे, पीयूष मानवटकर, किरण गेडाम यांनी केली. सणासुदीच्या काळात धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.