‘फ्रेन्चायजी’च्या नावावर सात लाखांनी फसविले; पाच जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 01:10 PM2022-11-26T13:10:06+5:302022-11-26T13:10:44+5:30
आराेपींचा शाेध सुरू
नागपूर : कंपनीची ‘फ्रेन्चायजी’ मिळवून देण्याची बतावणी करीत, व्यावसायिकास सात लाख रुपये स्वीकारून त्याला १० ते १५ लाख रुपये किमतीचे साहित्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, साहित्य आणि रक्कम न देता, त्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार कळमेश्वर शहरात नुकताच घडला. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्यांचा शाेध सुरू असल्याची माहिती पाेलिस अधिकाऱ्यांनी दिली.
अभिषेक भाेंडे (३६, रा.गाैतमनगर, कळमेश्वर), सागर रहांगडाले, हेमंत ब्राह्मणकर दाेघेही रा.गाेंदिया, सबरजीतसिंग सलुजा व हिंमतसिंग साेलंकी, दाेघेही रा.मुंबई अशी आराेपींची नावे आहेत. अभिषेक सागर व हेमंत यांनी मनाेज कृष्णा बागडे (४२, रा.कळमेश्वर) यांच्याशी संपर्क साधून आपण गिगल रिटेल प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्या तिघांनी मनाेज यांना गिगल कंपनीची ‘फ्रेन्चायजी’ मिळवून देण्याची बतावणी केली. त्यासाठी १० लाख रुपये कंपनीकडे भरून १० ते १५ लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रिकल साहित्य विक्रीसाठी मिळणार असल्याचे सांगितले.
चर्चेअंती मनाेज बागडे यांनी १० लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवित त्यांनी पहिल्यांदा सात लाख रुपये कंपनीच्या बँक खात्यात एनईएफटीमार्फत जमा केले. उर्वरित तीन लाख रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे व त्यानंतर करारपत्र करण्याचेही तिघांनी मनाेज बागडे यांना सांगितले. मात्र, ठरल्याप्रमाणे कुठलेही काम करण्यात आले नाही अथवा त्यांना साहित्यही देण्यात आले नाही.
मनाेज बागडे यांनी कंपनीचे मालक सबरजीतसिंग सलुजा व हिंमतसिंग साेलंकी यांच्याशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण हकिकत सांगितली. त्यावर दाेघांनी त्यांच्या वकिलामार्फत मनाेज यांना पाहून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी पाचही आराेपींविरुद्ध भादंवि ४२०, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिस्ताेवर आराेपींना अटक करण्यात आली नव्हती.