बापरे! सात महिन्यांच्या चिमुकल्याने गिळली आईच्या कानातली इअररिंग; डॉक्टरांनी केली प्रयत्नांची शर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 09:10 PM2022-07-23T21:10:55+5:302022-07-23T21:11:27+5:30
Nagpur News सात महिन्यांच्या बाळाने आईच्या कानातली रिंग गिळून टाकली. हे लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सगळे कौशल्य पणाला लावून ती रिंग विनाशस्त्रक्रिया बाहेर काढली व बाळाचे प्राण वाचवले.
नागपूर : सात महिन्यांच्या चिमुकल्याने आईची इअररिंग गिळली. ती अन्ननलिकेत जाऊन रुतून बसली. रिंगचे दोन्ही भाग टोकदार व त्यातच एवढ्या कमी वयाचे बाळ असल्याने ते काढणे सोपे नव्हते. रिंग काढताना अन्ननलिका फाटून बाळाच्या जिवाला धोका होण्याचीही शक्यता अधिक होती. परंतु, मेयोच्या ईएनटी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे यांनी आपले अनुभव व कौशल्य पणाला लावत, विनाशस्त्रक्रिया पोटातून रिंग बाहेर काढली, चिमुकल्याला जीवनदान मिळाले.
पाचपावली येथे राहणारा सात महिन्यांचा मितांश उमाटे असे चिमुकल्याचे नाव. शुक्रवारी मध्यरात्री मितांशला झोपविण्यासाठी आईने त्याला कडेवर घेतले. मितांश आईच्या कानातील रिंगशी खेळत होता. काही कळण्याच्या आत त्याने ती तोंडाने आढून गिळली. थोड्या वेळानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. तो रडू लागला. काय झाले असावे, या चिंतेत आई-वडील असताना कानाची इअररिंग गायब असल्याचे लक्षात आले. त्याला दूध, पाणी पाजून पाहिले; पण मुलाचे रडणे कमी होत नव्हते. पहाटेचे तीन वाजले होते. मितांशच्या आई-वडिलांनी त्याच स्थितीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) गाठले. त्यावेळी कार्यरत डॉक्टरांनी तातडीने एक्स-रे काढून खात्री करून घेतली. बदकाच्या आकाराची इअररिंग अन्ननलिकेत जाऊन फसली होती. याची माहिती डॉ. चंदनखेडे यांना दिली.
इअररिंग अन्ननलिकेच्या पहिल्या भागात होती
‘लोकमत’शी बोलताना डॉ. चंदनखेडे म्हणाले, सात महिन्यांचा बाळ, त्यात बदकाच्या आकाराची रिंग अन्ननलिकेच्या पहिल्या भागात फसली होती. रिंगचे दोन्ही भाग टोकदार होते. रिंग काढताना अन्ननलिका फाटण्याची भीती होती किंवा ती श्वासनलिकेत जाऊन जिवाला धोका होण्याची शक्यता होती. याची माहिती त्याच्या आई-वडिलांना देण्यात आली. त्यांच्या परवानगीने ‘इसोफेगोस्कोपी’ने रिंग काढण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकरणातील मागील अनुभव, कौशल्य व सहयोगी डॉक्टरांच्या मदतीने कुठेही इजा होऊ न देता रिंग बाहेर काढण्यात यश आले. बाळाची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात येईल.
- या डॉक्टरांचे मिळाले सहकार्य
ही शस्त्रक्रिया ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांच्या मार्गदर्शनात डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे यांच्या नेतृत्वात सहयोगी प्राध्यापक डॉ. विपीनराम ईखार, बधिरीकरण विभागाच्या डॉ. शीतल दलाल यांनी यशस्वी केली.
दुर्मीळ प्रकरण
साधारण एक ते दोन किंवा त्यापुढील वयोगटातील मुलांमध्ये नाणे किंवा इतर वस्तू गिळणे ही सामान्य बाब आहे. परंतु, सात महिन्यांच्या चिमुकल्याने इअररिंगसारखी तीक्ष्ण वस्तू गिळणे आणि ती अन्ननलिकेत जाऊन फसणे हे धोकादायक ठरते. त्यात कुठलीही दुखापत न होता ती बाहेर काढल्याने हे प्रकरण दुर्मीळ प्रकारात मोडते.
-डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे, सहायक प्राध्यापक ईएनटी विभाग मेयो