सात जणांना अटक
By admin | Published: July 19, 2015 03:11 AM2015-07-19T03:11:36+5:302015-07-19T03:11:36+5:30
आमदारास मारहाण प्रकरण : माथनी टोल नाक्यावरील घटना
तारसा : साकोलीचे आमदार बाळा ऊर्फ राजेश काशीवार (४२) यांना नागपूर-भंडारा महामार्गावरील माथनी परिसरातील टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ३.५५ वाजताच्या सुमारास मारहाण केली. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. याप्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हे नोंदवून सात जणांना शुक्रवारी रात्री अटक केली.
निखील रामेश्वर गायधने (२२, रेवराळ, ता. मौदा), आशिष किशोर खरगडे (२६, रा. मौदा), शुभम पंजाबराव म्हस्के (२०, रा. मारोडी, ता. मौदा), आशिष ईश्वर सहारे (३६, रा. नागपूर), अमर विनायक तईकर (२२, रा. मौदा), पुरुषोत्तम रतिराम निंबार्ते (३०, रा. मानेगाव) व दिगांबर दामोदर मेश्राम (२१, रा. पिंडकेपार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आ. काशीवार हे कारने नागपूरहून भंडारामार्गे साकोलीला जात होते. दरम्यान, माथनी शिवारातील टोल नाक्यावर कारचालकाने कार वेगळ्या लेनमधून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचारी निखील गायधने याने कार थांबविण्याची सूचना केली. आपण आमदार असल्याचे सांगितल्यावरही निखीलने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. यावरून वाद उद्भवला. हा वाद विकोपास गेल्याने टोल नाक्यावरील काही तरुणांनी त्यांना मारहाण केली. यात त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला.
दरम्यान, आ. काशीवार यांनी लगेच मौदा पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी भादंवि १४३, १४७, १४९, ३२३, ३२५ अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. या प्रकरणातील सातही आरोपींना शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आल्याची माहिती मौद्याचे ठाणेदार तागडे यांनी दिली. (वार्ताहर)