लोकमत इफेक्ट : अजनी पोलिसांवरील हल्ल्याचे प्रकरण कुख्यात काजू नाडेसह सात जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:53 AM2021-05-06T00:53:54+5:302021-05-06T00:54:53+5:30
police attacked case कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांवर हल्ला करणारा कुख्यात चिन्नू ऊर्फ काजू नाडे आज पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी काजूसह सात जणांना अटक केली आहे. यामुळे आता पोलिसांच्या पथकावर हल्ला करणाऱ्या अटकेतील आरोपींची संख्या ४२ झाली आहे. दरम्यान, अजनी पोलीस आता या परिसरातील नेता आणि कबाडीमध्ये असलेले लागेबांधे तपासत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांवर हल्ला करणारा कुख्यात चिन्नू ऊर्फ काजू नाडे आज पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी काजूसह सात जणांना अटक केली आहे. यामुळे आता पोलिसांच्या पथकावर हल्ला करणाऱ्या अटकेतील आरोपींची संख्या ४२ झाली आहे. दरम्यान, अजनी पोलीस आता या परिसरातील नेता आणि कबाडीमध्ये असलेले लागेबांधे तपासत आहेत.
३ मे रोजी सायंकाळी रहाटेनगर टोळीच्या अवैधधंद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता अजनी पोलिसांच्या पथकावर आरोपींनी हल्ला केला होता. दगडफेक करून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली होती. तीन महिला पोलिसांवर दगडफेक करून जखमी केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अवैध व्यवसाय उद्ध्वस्त केले होते. मंगळवारी रात्रीपर्यंत यातील ३५ आरोपींना अटक करून तसेच अवैध दारूविक्रीच्या प्रकरणी ४३ व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यांच्याकडून सात लाख दहा हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला होता. आरोपींमध्ये महिलांची संख्या अधिक होती. अजनी पोलिसांनी महिनाभरापूर्वी या टोलीवर धाड घालून येथील अवैध व्यवसाय उद्ध्वस्त केले होते. यामुळे आरोपी पोलिसांवर चिडलेले होते. पोलिसांची कारवाई झालीच तर काजू नाडे आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने हल्ला करून परतवून लावण्याची योजना या परिसरातील नेता आणि कबाडी यांनी आखली होती. त्यानुसारच ही हल्ल्याची घटना घडली. काजू नाडे, सचिन नाडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना या हल्ल्याची कल्पना होती. काजू हा दारूचा आणि जुगाराचा अड्डा चालवतो.
‘लोकमत’ने यापूर्वीच्या वृत्तामध्ये नेता, कबाडी आणि नाडे यांच्या हल्ल्यातील महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली होती. पोलिसांनी या दिशेने तपास आरंभला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नेता परिसरातील लोकांचा वापर करून घेतो. त्याच्या मदतीनेच जमीन हडपणे, व्याजाने रकमा देणे असे व्यवसाय कबाडी करतो. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास अनेक गुन्हेगारीची प्रकरणे पुढे येऊ शकतील. टोलीमध्ये यापुढे कोणतेही अवैध प्रकार होऊ न देण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. यामुळे अवैध व्यवसायाला सहकार्य करणारे चिंतेत आहेत. मारहाण केल्याचा आणि छळ केल्याचा पोलिसांवर आरोप करण्यासाठी ते येथील लोकांना चिथावणी देत आहे.