शहरातील ठाणेदारांसह सात पोलीस निरीक्षकांची खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:33+5:302021-06-09T04:11:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी दोन ठाणेदारांसह सात पोलीस निरीक्षकांची खांदेपालट केली. ठाणेदारांमध्ये बजाजनगरचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी दोन ठाणेदारांसह सात पोलीस निरीक्षकांची खांदेपालट केली. ठाणेदारांमध्ये बजाजनगरचे ठाणेदार महेश चव्हाण आणि कोतवालीचे ठाणेदार ज्ञानेश्वर भोसले यांचा समावेश आहे.
चव्हाण यांना आयुक्तालयात अर्ज शाखेत नियुक्त करण्यात आले असून, तेथे अजनीच्या गुन्हे निरीक्षक शुभांगी देशमुख यांची ठाणेदार म्हणून नियु्क्ती करण्यात आली. कोतवालीचे ठाणेदार भोसले यांची गुन्हे शाखेत तर गुन्हे शाखेचे मुकुंद ठाकरे यांची कोतवालीचे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. बजाजनगरच्या गुन्हे निरीक्षक वर्षा देशमुख यांची अंबाझरीत गुन्हे निरीक्षक म्हणून तर एसएसबीचे निरीक्षक रवी नागोसे यांची पाचपावलीत गुन्हे निरीक्षक म्हणून आणि गुन्हे शाखेचे सार्थक नेहते यांची अजनी पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. महिला ठाणेदार म्हणून देशमुख या शहरातील तिसऱ्या ठाणेदार ठरल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी यापूर्वी मानकापूरला वैजयंती मांडवधरे आणि वाठोड्याला आशालता खापरे यांना ठाणेदार म्हणून नेमले आहे. उपराजधानीतील ३२ ठाण्यापैकी तीन ठिकाणी महिलांना ठाणेदार म्हणून जबाबदारी देण्याची ही पहिलीच घडामोड ठरली आहे.
----
आणखी काहींना लवकरच धक्का
पोलीस आयुक्त अमितेशकुमार बदल्याच्या संबंधाने नेहमी धक्कातंत्राचा वापर करतात. ज्यांच्या नावाची चर्चा असते ते बाजूला सारून गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी कोण उपयुक्त ठरेल, त्याकडे ते लक्ष देतात. शहरातील रेशन माफियांना रान मोकळे करून देणाऱ्या निरीक्षकांसह अनेकांवर सध्या नजर असून त्यांना वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत ठेवण्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. आणखी काही ठाणेदारांना लवकरच धक्का मिळणार असल्याचीही चर्चा आहे.
----