Samruddhi Mahamarg: मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’पेक्षा सातपट लांब; समृद्धी महामार्ग ठरणार ‘गेमचेंजर’
By कमलेश वानखेडे | Published: December 11, 2022 09:54 AM2022-12-11T09:54:24+5:302022-12-11T09:55:03+5:30
या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे.
- कमलेश वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २००२ साली १६०० कोटी रुपये खर्च करून ९४.५ किमीचा मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’ बांधण्यात आला होता. या मार्गामुळे मुंबई-पुण्याच्या एकूणच विकासात भर घातली. आता तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च करून ७०१ किलोमीटर लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग साकार होत आहे. हा मार्ग तब्बल १० जिल्हे व २६ तालुक्यांना जोडणार असून, हा मार्ग महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.
या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी, नव उद्योजक, लहान उद्योजक, व्यापारी यांना त्यांच्या उद्योग, व्यवसायाच्या वाढीसाठी हा मार्ग एकप्रकारे वरदान ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांत जास्त खनिज संपदा चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व आसपासच्या परिसरात आहे. मात्र, खनिजावर आधारित कारखानदारी एक हजार किलोमीटरवर आहे. दूरवरच्या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल पोहोचविणे आता सोयीचे होणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतमाल लवकर मुंबईसारख्या मार्केट यार्डमध्ये पोहोचविणे शक्य होईल.
पर्यटन फुलणार : हा महामार्ग शिर्डी, वेरुळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर, नाशिक, इगतपुरी आदी विविध पर्यटन स्थळांना जोडतो. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल.
राज्याची उपराजधानी नागपूर ते देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा हा मार्ग पूर्ण झाला असून, लोकार्पणाची नागपूरजवळील हिंगणा तालुक्यातील वायफळ येथे अशी जय्यत तयारी झाली आहे. (छाया : विशाल महाकाळकर)
एका एकरमध्ये उभारला मंडप
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी एका एकरात मंडप उभारला गेला आहे. तेथे तीन हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे. धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील ७३ किलोमीटर हद्दीतून हा समृद्धी महामार्ग गेला आहे. आसेगाव व शिवणी येथे २० किमी अंतरावर दोन टोल आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघातील ग्रामस्थांना या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे, यासाठी आसेगाव सावळा फाटा परिसरात एक एकरात मंडप उभारण्यात आला, तर १६ बाय १२ ची डिजिटल स्क्रीन लावण्यात आली आहे.