डेंग्युच्या रुग्णांसाठी सात ते चौदा दिवस महत्त्वाचे; लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

By सुमेध वाघमार | Published: August 17, 2023 06:04 PM2023-08-17T18:04:45+5:302023-08-17T18:05:25+5:30

४०-६० टक्के रुग्णांचे घटतात प्लेटलेट्स

Seven to fourteen days are critical for dengue patients; Consult a doctor as soon as symptoms appear | डेंग्युच्या रुग्णांसाठी सात ते चौदा दिवस महत्त्वाचे; लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

डेंग्युच्या रुग्णांसाठी सात ते चौदा दिवस महत्त्वाचे; लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

googlenewsNext

नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाढत्या डेंग्यू रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. विशेषत: तीन ते चार दिवसांत डेंग्यूचा ताप कमी होताच रुग्णाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्लेटलेट्स कमी होऊन जीवाचा धोका वाढत आहे. डेंग्यूच्या रुग्णांसाठी सात ते चौदा दिवस महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यात डेंग्यु, मलेरीयासारख्या आजारांसह जिवाणूजन्य, बुरशीजन्य व व्हायरल संसगार्मुळे प्लेटलेट्स कमी होऊ शकतात.  डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्याने रक्त गोठण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे जीवाचा धोकाही संभवतो. अशा वेळी साध्या तापाकडेही दुर्लक्ष करू नये, असे डॉ. रिया बालीकर यांचे म्हणणे आहे.

- सातव्या दिवसांपासून प्लेटलेट्स होतात कमी

डेंग्यू झाल्यानंतर रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण घटत असले तरी ताप आल्यानंतर तातडीने प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होत नाही. साधारणत: सातव्या दिवशीपासून प्लेटलेट्स कमी होतात, असे निरिक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. त्यावेळी ताप कमी झाल्याने रुग्णाचे प्लेटलेट्सच्या संख्येकडे दुर्लक्ष होऊ शकते. एकूणच डेंग्यु विकारामध्ये सात ते चौदा दिवस हे फार महत्त्वाचे असतात. चौदाव्या दिवसानंतर पुन्हा प्लेटलेट्सचे प्रमाण वाढू लागते.

- ५ ते १० टक्के रुग्णांमध्येच धोकादायक पद्धतीने प्लेटलेट्मध्ये घट

डेंग्यू रुग्णांमध्ये प्लेटलेट्स कमी होणे ही सामान्य बाब आहे. ४० ते ६० टक्के रुग्णांच्या शरिरातील प्लेटलेट्स कमी होतात. पण, केवळ ५ ते १० टक्के रुग्णांमध्येच प्लेटलेट्स धोकादायक पद्धतीने घट होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे डेंग्यू होताच फार अधिक चिंता करण्याची गरज नाही. पण, तापाकडे दुर्लक्ष नको, काळजी निश्चितच घ्यावी, डॉक्यरांचा सल्ला व योग्य औषधोपचार घ्यावा.

- प्लेटलेट्स २० हजारांच्या खाली आल्यास धोका

 प्लेटलेट्स रक्तातील सर्वात छोट्या पेशी असतात. रक्तातील ‘क्लॉटिंग’ घटकांसह रक्तस्त्राव थांबविणे हे प्लेटलेट्सचे मुख्य कार्य आहे. रक्तात प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास रक्त स्त्राव होण्याचा धोका वाढतो. शरीरात १.५ लाख ते ४.५ लाख प्लेटलेट्स प्रति ‘मायक्रोलिटर’ असतात. मात्र, त्यांची संख्या २० हजारांच्या खालती आली तर धोक्याची पातळी ओलांडल्याचे मानले जाते. अशा वेळी रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स देण्याची गरज पडू शकते. याशिवाय  डेंग्यूसोबतच इतरही आजार उद्भवतात. यकृत, फुफ्फूस, मेंदू आणि किडनीवरही परिणाम होतो. ही स्थिती निर्माण झाल्यास रुग्णास भरती करणे गरजेचे असते. मात्र, वेळेत उपचार केले तर गुंतागूंत टाळता येऊ शकते. 

- पपईचा पानाचा रसामुळे प्लेटलेट्स वाढत नाही

डेंग्यु झाल्यानंतर पपईच्या पानांचा रस व पपई देण्यात येते. शिवाय किवीसारखी काही फळ देखील दिल्या जातात. मात्र, त्यामुळे प्लेटलेट्स वाढत असल्याचे आढळून आले नाही. शिवाय याला कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. उलट कुणाला प्लेटलेट्सची गरज असल्यात ते दान करण्यावर भर द्यावा. 

- डॉ. रिया बालीकर, रक्तविकार तज्ज्ञ

Web Title: Seven to fourteen days are critical for dengue patients; Consult a doctor as soon as symptoms appear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.