ड्रॅगन पॅलेस परिसरात साकारणार 'सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:16 PM2019-10-05T23:16:01+5:302019-10-05T23:16:57+5:30
कामठी येथील जगविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’ टेम्पल परिसरात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड असे संबोधण्यात येईल, अशी माहिती ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख आणि केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्य अॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी येथील जगविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’ टेम्पल परिसरात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड असे संबोधण्यात येईल, अशी माहिती ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख आणि केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्य अॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, संपूर्ण जगाने तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान स्वीकारले. यात जपान, चीन, श्रीलंका, म्यानमार थायलंड, इंडोनेशिया यासह अनेक महत्त्वांच्या देशांचा समावेश आहे. या देशातील भाषा, संस्कृती भिन्न असल्यामुळे त्यांच्यात शैक्षणिक संस्कृती, शिक्षण व कला यांचे हे एक संयुक्त प्र्रकल्प म्हणून हा प्रकल्प उभारला जात अहे. ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येत्या मंगळवारी धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजीजू हे प्रमुख अतिथी राहतील. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या महोत्सवात या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क, माहिती पुस्तकाचे प्रकाशन व वेबसाईटचे उद्घाटन करण्यात येईल. पत्रकार परिषदेला नगरसेविका वंदना भगत, नंदा गोडघाटे उपस्थित होत्या.
विशेष बुद्धवंदना
ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये मंगळवारी सकाळी ९ वाजता भिख्खू संघ आणि डॅगन पॅलेसच्या संस्थापक अॅड. सुलेखा कुंभारे विशेष बुद्धवंदना ग्रहण करतील. यानंतर विपश्यना मेडिटेशन सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र परिसरात भंतेंना चिवरदान तसेच भोजनाचा कार्यक्रम होईल.