बालिकेचा विनयभंग करणाऱ्यास सात वर्षाचा तुरुंगवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 02:30 PM2022-03-11T14:30:12+5:302022-03-11T14:34:50+5:30
ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नीळगाव (आदासा), ता. कळमेश्वर येथे दाेन वर्षापूर्वी घडली हाेती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर (नागपूर) : १२ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाेषी ठरविण्यात आलेल्या आराेपीस अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. आय. त्रिवेदी यांच्या न्यायालयाने वेगवेगळ्या कलमान्वये एकूण सात वर्षाचा सश्रम तुरुंगवास आणि पाच हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नीळगाव (आदासा), ता. कळमेश्वर येथे दाेन वर्षापूर्वी घडली हाेती.
आकाश बाबाराव मेश्राम (२४, रा. नीळगाव-आदासा, ता. कळमेश्वर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. आकाशने २७ जुलै २०२० राेजी दुपारी २ वाजताच्या सुमारास १२ वर्षीय बालिकेला फाेन करून त्याच्या घरी बाेलावले हाेते. त्याने घरी कुणीही नसल्याचे पाहून तिचा विनयभंग केला. हा प्रकार तिने आईला सांगितल्याने आईने तिला विश्वासात घेत पाेलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे सावनेर पाेलिसांनी भादंवि ३५४, ३५४ (अ), ५०४, ५०६, ५०७, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सहकलम ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करून, ९ जुलै २०२० राेजी आराेपी आकाशला अटक केली.
तपास अधिकारी तथा सहायक पाेलीस निरीक्षक वाझे यांनी संपूर्ण तपासकार्य पूर्ण करून प्रकरण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आय. त्रिवेदी यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट केले. न्यायालयाने या प्रकरणाच्या दाेन्ही बाजू तसेच साक्षपुरावे तपासून बघत आकाशला दाेषी ठरवले. न्यायालयाने आकाशला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सहकलम ७, ८ अन्वये तीन वर्षाचा सश्रम तुरुंगवास व दाेन हजार रुपयाचा दंड, भादंवि ३५४, ३५४ (अ), ५०६ अन्वये तीन वर्षाचा सश्रम तुरुंगवास व दाेन हजार रुपयाचा दंड तसेच भादंवि ५०४ अन्वये एक वर्षाचा सश्रम तुरुंगवास व एक हजार रुपयाचा दंड असा एकूण सात वर्षाचा सश्रम तुरुंगवास आणि पाच हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या तिन्ही कलमान्वये सुनावण्यात आलेल्या दंडाच्या रकमेचा भरणा न केल्यास न्यायालयाने आराेपीला प्रत्येकी दाेन, दाेन व एका महिन्याच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील ॲड. पांडे यांनी युक्तिवाद केला. काेर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पाेलीस निरीक्षक वाझे, सहायक फाैजदार शंकरराव तराळे, हवालदार मनाेज तिवारी यांनी मदत केली.