निवृत्ती वेतनासाठी सात वर्षे प्रतीक्षा
By admin | Published: June 29, 2016 02:53 AM2016-06-29T02:53:52+5:302016-06-29T02:53:52+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या चुकीच्या गोष्टीसाठी नेहमीच चर्चेत राहते.
विद्यापीठाचा प्रताप : हायकोर्टाने फटकारले
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या चुकीच्या गोष्टीसाठी नेहमीच चर्चेत राहते. अशीच एक गोष्ट म्हणजे विद्यापीठाने एका महिला व्याख्यातेला तब्बल सात वर्षे निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवले आहे. ३१ डिसेंबर २००९ रोजी सेवानिवृत्त झालेल्या व्याख्यातेच्या निवृत्ती वेतनाची कागदपत्रे अद्याप अंतिम करण्यात आलेली नाहीत. यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विद्यापीठाला कडक शब्दांत फटकारले.डॉ. वीणा मुळे असे पीडित व्याख्यातेचे नाव आहे.
त्यांनी येथे ३९ वर्षे सेवा दिली. त्यांची याचिका न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली होती. दरम्यान, न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता विद्यापीठाला खडेबोल सुनावले व मुळे यांची याचिका मंजूर केली. विद्यापीठाने मुळे यांची निवृत्ती वेतनाची कागदपत्रे एक महिन्यात अंतिम करून ते राज्य शासनाला पाठविण्यात यावेत, राज्य शासनाने मुळे यांचे थकीत निवृत्ती वेतन तीन महिन्यात देऊन यानंतर त्यांना नियमित निवृत्ती वेतन मिळेल याची व्यवस्था करण्यात यावी आणि मुळे यांचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित करून त्यांना १ जानेवारी २००६ ते सेवानिवृत्तीपर्यंतची थकबाकी देण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सेवा मान्यताप्राप्त नसल्याचे कारण देऊन मुळे यांना निवृत्ती वेतन व सहाव्या वेतन आयोगाचे लाभ नाकारण्यात आले होते. यासंदर्भात त्यांना ३ मार्च २०१५ रोजी पत्र पाठविण्यात आले होते. याचिकाकर्तीतर्फे अॅड. एस.एस. शर्मा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)