ई पीक पाहणी ॲपमध्ये सतरा विघ्ने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:10 AM2021-09-21T04:10:21+5:302021-09-21T04:10:21+5:30

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : शेतातील पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी राज्य शासनाने कृषी आणि महसूल विभागाच्या ...

Seventeen interruptions in the e-crop survey app | ई पीक पाहणी ॲपमध्ये सतरा विघ्ने

ई पीक पाहणी ॲपमध्ये सतरा विघ्ने

googlenewsNext

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : शेतातील पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी राज्य शासनाने कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त मोहिमेतून ई-पीक पाहणीचा डिजिटल उपक्रम धडाक्यात सुरू केला. १६ ऑगस्टपासून ‘ई पीक पाहणी’ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. अनेक शेतकरी आपल्या शेतात यूट्यूब चित्रफितींच्या मार्गदर्शनानंतर नोंदणी करण्यासाठी शेतशिवारात गेले. कधी नेटवर्क नाही, कधी एरर, तर कधी फोटो काढल्यानंतर अक्षांश आणि रेखांश शोधण्यासाठी सतरा भानगडी पुढे येत असून, सध्या तरी ई पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

उमरेड तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या २३,३९९ आहे. यापैकी केवळ ५ ते १० टक्के शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी नोंदणी साधली. अन्य शेतकरी अँड्रॉइड मोबाईल, नेटवर्क, आदी अनेक तांत्रिक अडचणींमुळे त्रस्त झाले आहेत. आधी गावखेड्यातील नेटवर्कची सेवा सक्षम करा, अशी मागणी या उपक्रमाच्या निमित्ताने केली जात आहे.

प्रारंभी प्रत्येक जिल्ह्यातून एका तालुक्याची निवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली होती. त्यानंतर १६ ऑगस्टपासून राज्यभरात योजना राबविण्यात आली. १५ सप्टेंबर अखेरची तारीख होती. आता वाढवून ३० सप्टेंबर केली गेली. दुसरीकडे तलाठ्यांना त्यांच्या उर्वरित प्रक्रियेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. एकीकडे हवामानाचा ताल बिघडला आहे. सोयाबीन, कपाशीचे पीक चांगलेच संकटात सापडले असून, असंख्य अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

ई पीक पाहणी नोंदणी शेतकऱ्यांनी केली नसल्यास त्यांना योजना आणि लाभ मिळण्यास अडचणी येणार आहेत. तेव्हा ई-पीक पाहणीच्या माध्यमातून नोंदणी करणे गरजेचे झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी या माध्यमातून नोंद केली, त्या शेतकऱ्यांना सोयी, सुविधांचा लाभ तातडीने मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

सतरा भानगडी

ई-पीक पाहणी ॲप आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर संपूर्ण क्षेत्रात कोणकोणते पीक आहे त्याची नोंद केली जाते. अक्षांश-रेखांश दाखविणारे छायाचित्र काढून ही संपूर्ण माहिती शेतशिवारातून ऑन दि स्पॉट पाठविली जाते. जीपीआरएस ऑन असलेले लाईव्ह फोटो यासाठी लागतात. तास-दोन तास ही प्रक्रिया झाल्यानंतर तलाठ्यांच्या लॉगिनवर त्याची नोंद होते. त्यानंतर तलाठ्यांकडून पडताळणी केली जाते. त्यानंतरच नमुना १२ मध्ये पिकांची नोंद घेतली जाते. कधी ॲप काम करीत नाही, तर कधी नेटवर्क सापडत नाही, तर कधी कधी काम पूर्णत्वास येत असताना अचानकपणे ‘एरर’ येतो आणि चांगल्या कामाचे बारा वाजवून जातो. या ई पीक पाहणी उपक्रमात अनेक भानगडींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

-

शेतकऱ्यांना बसतोय भुर्दंड

असंख्य शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. ज्यांच्याकडे आहे, त्यांना वापरता येत नाही. अशावेळी एखाद्याला विनंती करीत पैसे घे आणि नोंदणी करून दे अशी विनवणी शेतकरी करीत आहेत. तासनतास शेतात नोंदणी केल्यानंतर अनेकांपुढे तांत्रिक अडचणी येत आहेत. अशावेळी एकाच शेतात दिवसभर नोंदणी करीत बसायचे काय, असा प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना भुर्दंडसुद्धा बसत असून, शासनाने आधी नेटवर्कची समस्या सोडवावी, अशी मागणी राहुल तागडे या शेतकऱ्याने केली आहे.

--

यूट्यूबवर सर्च करत अनेकजण ई-पीक पाहणीची शोधाशोध करीत आहेत. मी संबंधित कर्मचाऱ्यापुढे नोंदणी होत नसल्याची कैफियत मांडली. त्यांनी मोबाईल बदलण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मोबाईल बदलणे कोणत्या भावात पडेल.

राहुल तागडे

रा. सोनपुरी, ता. उमरेड

-------------------

Web Title: Seventeen interruptions in the e-crop survey app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.