मेडिकलमध्ये सातवे ऑर्गन रिट्रिव्हल : २१ वर्षीय युवकाचे अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 01:04 AM2019-11-13T01:04:32+5:302019-11-13T01:08:22+5:30
२१ वर्षीय युवकाचा ‘ब्रेन डेड’ झाल्याच्या त्या दु:खातही नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेत समाजासमोर आदर्श ठेवला. तीन रुग्णांना जीवनदान मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आशेचे किरण ठरले आहे. मंगळवारी सातवे ‘ऑर्गन रिट्रिव्हल’,म्हणजे मृत व्यक्तीकडून अवयव काढण्याची प्रक्रिया पार पडली. विशेषत: २१ वर्षीय युवकाचा ‘ब्रेन डेड’ झाल्याच्या त्या दु:खातही नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेत समाजासमोर आदर्श ठेवला. तीन रुग्णांना जीवनदान मिळाले.
अमित विजय शर्मा (२१) रा. गजानन प्रसाद दत्तवाडी असे त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी अमित आपल्या दुचाकीने जात असताना वाडी नाका येथे अपघात झाला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तातडीने जवळच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने १० नोव्हेंबरला मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. त्याच्यावर तातडीने उपचाराला सुरुवात झाली. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी अमितच्या नातेवाईकाला दिली. त्या स्थितही ट्रॉमा केअर सेंटरचे प्रमुख डॉ. मोहम्मद फैजल, सामाजिक अधीक्षक श्याम पंजाला, प्रार्थना द्विवेदी यांनी नातेवाईकांना अवयवदान करण्याचा सल्ला दिला. अमितचा भाऊ पुनित आणि सुमितने त्या दु:खातही अवयवदानासाठी पुढाकार घेतला. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेडिकल ऑर्गन रीट्रिव्हल नोडल अधिकारी डॉ. नरेश तिरपुडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, न्युरो सर्जन डॉ. पवित्र पटनाईक, डॉ. सी.एम. अतकर यांनी तातडीने पुढील आवश्यक उपाययोजना केल्या. याची माहिती झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात नागपूर झोन कॉर्डिनेटर विना वाटोरे यांनी अवयवदानाची पुढील प्रक्रिया पूर्ण केली.
या वर्षातील १५वे अवयवदान
झेडटीसीसी’ने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१३ ते आतापर्यंत ६१ दात्यांनी अवयवदान केले. या वर्षातील हे १५ वे अयवदान होते. अमित शर्मा यांच्याकडून मिळालेले एक मूत्रपिंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या २२ वर्षीय युवकाला देण्यात आले. ही शस्त्रक्रिया मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, युरोलॉजिस्ट डॉ. धनंजय सेलुकर, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. प्रतिक लढ्ढा, डॉ. सी.पी. बावनकुळे, डॉ. व्ही. रामटेके, डॉ. पीयूष किंमतकर, डॉ. वंदना आमदने, डॉ. रितेश बनसोड व डॉ. मेहराज शेख आदींनी यशस्वी केली. दुसरे मूत्रपिंड ५७ वर्षीय पुरुष रुग्णाला एका देण्यात आले.
२६वे यकृत प्रत्यारोपण
गेल्या दोन वर्षात उपराजधानीत यकृत प्रत्यारोपणाला सुरूवात झाली. आतापर्यंत झालेल्या ४६ यकृत प्रत्यारोपणात सर्वाधिक प्रत्यारोपण न्यू इरा हॉस्पिटलमध्ये झाले. हे २६वे प्रत्यारोपण ४० वर्षीय रुग्णावर यशस्वी पार पडले. ही शस्त्रक्रिया डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. निधीश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहिल बन्सल व डॉ. अश्विनी चौधरी यांनी यशस्वी केली.