नागपुरात रेती भरलेल्या ट्रकने दिली अनेकांना धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 01:03 AM2020-03-21T01:03:15+5:302020-03-21T01:05:26+5:30
रेतीने भरलेल्या एका ट्रकच्या चालकाने मानेवाडा रिंगरोडवर शुक्रवारी सकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास प्रचंड दहशत पसरवली. एका पाठोपाठ अनेक वाहनांना आरोपी ट्रकचालकाने धडक मारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेतीने भरलेल्या एका ट्रकच्या चालकाने मानेवाडा रिंगरोडवर शुक्रवारी सकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास प्रचंड दहशत पसरवली. एका पाठोपाठ अनेक वाहनांना आरोपी ट्रकचालकाने धडक मारली. सुदैवाने जीव वाचवून अनेकांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.
आरोपी ट्रकचालक अतुल भास्कर भिवनकर याने त्याच्या ताब्यातील रेतीने भरलेला ट्रक (एमएच ४०/ बीजी ४५५२) मानेवाडा रिंगरोडवर सुसाट वेगाने चालवून आधी स्टार बस क्र. एमएच ४० / बीजी ११६३) ला जोरदार धडक मारली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी असलेली महिंद्रा एक्सयूव्ही (एमएच ४९/ एएस ३९१९), बजाज डिस्कव्हर, अॅक्टीव्हा, होंडा व्टिस्टर आणि होंडा सीडी १०० ला धडक मारली. या अपघात मालिकेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
फिर्यादी चंद्रशेखर सुरेश आटे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालक अतुल भास्कर भिवनकर (वय २४, रा. खलासना, कळमना) याला अटक केली. रेतीची तस्करी करणारे, ओव्हरलोड वाहने चालविणारे रेती तस्कर रात्रभर रिंग रोडने जड वाहने बेदरकारपणे चालवितात. महसूल, आरटीओ किंवा पोलीस मागे लागल्यास ते वाट मिळेल तिकडे वाहने दामटतात. आज सकाळी संबंधित अधिकाऱ्याच्या धाकामुळेच रेतीने भरलेला ट्रक आरोपीने बेदरकारपणे पळविल्यामुळे हा अपघात घडल्याची चर्चा होती.