यंदा पडणार कडाक्याची थंडी; वातावरणात गारवा वाढला, साथीला सर्दी-खोकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 12:28 PM2022-10-31T12:28:39+5:302022-10-31T12:35:17+5:30
सध्या दिवसा उन आणि रात्री गारवा अशा दुहेरी वातावरणाचा सामना करावा लागताे आहे
नागपूर : पावसाळा संपला तसा ऑक्टाेबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीची चाहुल लागली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते यावर्षी थंडीचा तडाखा अधिक जाणवणार आहे. वातावरणात गारवा वाढला आहे, तसे आजारांचे प्रमाणही वाढले असून घराेघरी सर्दी, खाेकल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
रविवारी नागपूरचे किमान तापमान १६.८ अंश नाेंदविण्यात आले. हे सरासरीच्या आसपास आहे. गुरुवार, शुक्रवारपेक्षा काही अंशाची त्यात वाढ झाली आहे. दिवसाचे कमाल तापमान ३०.८ अंश असून सरासरीपेक्षा १.५ अंशाने खाली आहे. नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तरी रात्री व दिवसाचा पारा याच सरासरीत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, गारठा हळूहळू वाढत चालला आहे. २०१२ पासून दशकभरात २०१९ साली सर्वाधिक आणि सर्वांत कमी तापमानाची नाेंद करण्यात आली हाेती. ४ ऑक्टाेबर २०१९ राेजी ते ३९.८ अंशावर हाेते आणि २५ ऑक्टाेबर २०१९ राेजी ते ११.६ अंशाच्या निच्चांकीवर हाेते. यावर्षी ऑक्टाेबर हिट ३५ अंशापर्यंत गेली आहे; पण १५ अंशाच्या खाली आले नाही. २७ ऑक्टाेबरला ते १५.२ अंशावर गेले हाेते.
दरम्यान, नाेव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पारा घसरण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये कडाक्याच्या थंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. या महिन्यात थंडीच्या दाेन लाटा येण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात तीव्रतेची जाणीव हाेईल.
ज्येष्ठांनी स्वत:ला जपावे
सध्या दिवसा उन आणि रात्री गारवा अशा दुहेरी वातावरणाचा सामना नागपूरकरांना करावा लागताे आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा त्रास अधिक हाेत आहे. घराेघरी सर्दी, खाेकला, तापाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. अशावेळी लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. मुलांना थंड पेय किंवा पाणी देऊ नये, त्यांना साखरेचे पदार्थ अधिक देऊ नये, ज्यामुळे जीवाणूजन्य आजार हाेण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. गारवा वाढत असल्याने उबदार कापडांच्या दुकानात लाेकांची गर्दीही वाढली आहे.