सांडपाणी होणार ‘निर्मळ’; तूरडाळीच्या भुश्याचा वापर करून जलशुद्धीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 10:35 AM2021-02-04T10:35:01+5:302021-02-04T10:36:56+5:30
Nagpur News तूरडाळीच्या उत्पादनात भारत आघाडीवर असून दरवर्षी डाळीचा भुसा मोठ्या प्रमाणावर वाया जातो. मात्र याच भुश्याचा वापर करून ‘व्हीएनआयटी’चे सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीराम सोनवणे यांनी ‘मॅजिक’ घडविले आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तूरडाळीच्या उत्पादनात भारत आघाडीवर असून दरवर्षी डाळीचा भुसा मोठ्या प्रमाणावर वाया जातो. मात्र याच भुश्याचा वापर करून ‘व्हीएनआयटी’चे सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीराम सोनवणे यांनी ‘मॅजिक’ घडविले आहे. भुश्याचा वापर करून चक्क सांडपाण्याला पिण्यायोग्य निर्मळ करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या संशोधनाला मान्यता देखील मिळाली असून भारत सरकारकडून पेटंट प्रदान करण्यात आले आहे.
तुरीच्या पिकाचे रूपांतरण तूरडाळीत करण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भुसा निर्माण होतो. मात्र त्याचा फारसा उपयोग नसल्याने तो फेकल्या जातो व त्यामुळे वातावरणात धुलिकणांचे प्रमाणदेखील वाढते. परंतु या भुश्यातील तत्त्वांमधील शोषक घटत लक्षात घेता त्यादृष्टीने संशोधन करण्यात आले. या भुश्यापासूनच कार्यक्षम शोषकाची (अॅडसॉर्बन्ट) निर्मिती केली गेली. यात ‘सल्फरिक अॅसिड’चा उपयोग करून ‘कार्बनायझेशन’ करण्यात आले. सांडपाण्यात मोठ्या प्रमाणावर धातूतत्त्व असतात. तांबे व ‘लीड’सारख्या कठोर धातूंना पाणी व इतर स्रोतांपासून विलग करण्यावर मुख्य लक्ष केंद्रित केले गेले. आधुनिक विश्लेषण साधने आणि मानक पद्धतींचा वापर करून विकसित केलेल्या शोषकाच्या भौतिक-रासायनिक गुणधर्म घटकाचा अभ्यास करण्यात आला. संशोधनाअंती कठोर धातू सांडपाण्यापासून विलग करण्यात यश आले. संबंधित संशोधनाची पेटंटसाठी नोंदणी करण्यात आली व त्याला नुकतेच शासनाकडून पेटंट प्रदान करण्यात आले. डॉ. सोनवणे यांच्या संशोधनात डॉ. विशाल पराते, डॉ. एम.आय. तालिब आणि डॉ. अजित राठोड हे देखील सहभागी झाले होते.
प्रक्रिया उद्योगांसाठी ‘इकोफ्रेंडली’ मार्ग
या प्रक्रियेतून अजैविक प्रदूषक, खनिज रसायने, धातू संयुगे, अजैविक क्षार, सल्फेट व सायनाईड देखील पाण्यातून वेगळे काढणे शक्य झाले आहे. यामुळे प्रक्रिया उद्योगांतून बाहेर निघणारे सांडपाणी तेथेच शुद्ध करता येईल व त्यामुळे जल प्रदूषणावर नियंत्रण आणता येईल. भविष्यात यावर आणखी सखोल संशोधन करून तूरडाळ उद्योगासाठी शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल प्रक्रिया विकसित करण्यावर भर असेल, असे डॉ. श्रीराम सोनवणे यांनी सांगितले. ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांच्यासह अन्न तंत्रज्ञान विभाग, युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (यूआयसीटी), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांचे देखील मौलिक सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.