सिवर लाईन लिकेज; नळाला दुषित पाणी()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:07 AM2021-08-01T04:07:25+5:302021-08-01T04:07:25+5:30
आरोग्याला धोका : चाफले ले-आऊटमधील नागरिक त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जीर्ण व नादुरुस्त सिवर लाईनची ...
आरोग्याला धोका : चाफले ले-आऊटमधील नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीर्ण व नादुरुस्त सिवर लाईनची समस्या शहराच्या सर्वच भागात आहे. चापले ले-आऊट भागात सिवरेज लाईनखाली नळाची लाईन आहे. ही लाईन नादुरुस्त असल्याने नळाला दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
दक्षिण नागपुरात सिवरेज लाईनची समस्या आहे. पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या अधिकच गंभीर बनते. ४० ते ५० वर्षापूर्वीच्या सिवरेज लाईन आहेत. वाढत्या लोकसंख्येचा भार सिवरेज लाईनवर वाढला आहे. त्यात त्या जीर्ण झाल्याने जागोजागी लिकेज होण्याची समस्या निर्माण झाली आहे. चापले ले -आऊट परिसरातील नागरिक नादुरुस्त सिवरेज लाईनमुळे त्रस्त असून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
....
सिवरेजचे घाण पाणी रस्त्यावर
सिवरेज लाइंन जागोजागी नादुरुस्त झाल्याने वस्त्यांत दूषित पाणी वाहत आहे. पाऊस आला की रस्त्यावरील दूषित पाणी लोकांच्या घरात शिरते. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
...
चेंबरवरील झाकणांची चोरी
चेंबरवरील झाकणांची चोरी झाली आहे. झाकण नसल्याने त्यात माती व कचरा साचून सिवरेज लाईन बंद पडण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे आजूबाजूला दुर्गंधी पसरत आहे.
...
खाली प्लाॅटवर पाणी साचले
दक्षिण नागपुरात मोठ्या प्रमाणात खाली प्लाॅट आहेत. यावर पावसाचे पाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात जंतुनाशकाची फवारणी होत नसल्याने साथीचे आजार वाढले आहेत. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
....
विहिरींचे पाणी दूषित
गडरलाईन लिकेज असल्याने सांडपाणी जमिनीत मुरत असल्याने घरातील विहिरी दूषित झाल्या आहेत. विहिरीच्या पाण्याचा वापर करता येत नाही. त्यात जुन्या इमारती पडण्याची शक्यता आहे. यामुळे जीर्ण घरातील नागरिक दहशतीत आहेत.
...
अतिक्रमणाची समस्या
सिवरेज लाईनवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळे सिवरेज दुरुस्त करताना मनप कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. याला झोन स्तरावरील अधिकारी जबाबदार असून अतिक्रमणाला वेळीच आळा घातला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
...
या भागात समस्या
मानेवाडा, नरसाळा, भोले नगर, पिपळा, कल्याणेश्वर नगर, जवाहर नगर, अयोध्यानगर, चंदनगर, बिडीपेठ, आशीर्वाद नगर, ताजबाग, भांडे प्लॉट, शारदा नगर, विणकर कॉलनी, रमणा मारोती, दिघोरी, रघुजीनगर, विश्वकर्मा नगर यासह अन्य वस्त्यात सिवरेज लाईन लिकेज होण्याची समस्या आहे.
...
चाफले ले-आऊट नागरिकांची मनपाकडे तक्रार
सिवरेज समस्या, नादुरुस्त रस्ते, जागोजागी साचलेला कचरा, उखडलेले रस्ते यामुळे त्रस्त प्रभाग ३४ मधील चाफले ले-आऊट येथील नागरिकांनी
महापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, झोन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यात ज्ञानेश्वर मून, मंगेश नाईक, लता मून, मुकेश तेलमोरे, विमल साळवे, दिनेश रेवाडिया, सुशिला कांबळे, वर्णमाला तेलमोरे , विनोद चौधरी, सुजित चौधरी, आशा चौधरी, नितीन राऊतकर, समीर शेख, मीना शिंदे, नरेंद्र शरणागत, सरेश्वर शंभरकर, विनोद वाघमारे, अनिल गणवीर, नीलेश वैद्य यांच्यासह वस्तीतील नागरिकांचा यात समावेश आहे.