सिवरेज लाईन तुबल्या; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:07 AM2021-02-07T04:07:31+5:302021-02-07T04:07:31+5:30
महापालिका प्रशासन सुस्त : विश्वकर्मानगरातील नागरिकांच्या तक्रारींची दखलही नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील सिवरेज लाईन ...
महापालिका प्रशासन सुस्त : विश्वकर्मानगरातील नागरिकांच्या तक्रारींची दखलही नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सिवरेज लाईन जुन्या झाल्या आहेत. अनेक वस्त्यांतील सिवरेज लाईनवर लोकसंख्येचा अतिरिक्त भार वाढल्याने त्या दुरुस्तीला आल्या आहेत; परंतु याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. विश्वकर्मानगर व चंद्रमणीनगर पुतळ्याजवळील सिवरेज लाईन मागील काही महिन्यांपासून तुंबलेली आहे. यामुळे विश्वकर्मानगर गल्ली क्रमांक १३ यांसह परिसरातील नागरिकांनी धंतोली झोनकडे वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती होत नसल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
सिवरेज तुंबल्याने आजूबाजूच्या परिसरात घाण पाणी वाहत असूनही महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने राजू वाघमारे यांनी मजूर लावून तुंबलेल्या सिवरेज लाईनमधील गाळ व कचरा काढला. काही दिवस दूषित पाणी तुंबण्याचा प्रकार थांबला; परंतु यातून समस्या कायमस्वरूपी सुटलेली नाही. दूषित पाणी साचून असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने तत्काळ सिवरेज लाईन दुरुस्त करावी, अशी मागणी रवींद्र वाघमारे, जितेंद्र हुमणे, सुरेंद्र भगत, प्रणय परेकार, सुनील सरदार, नितीन डोंगरे, मधुकर चाफले, राजेश करंडाले, सुजाक वाघमारे, माणिक जनबंधू, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी झोन कार्यालयाला निवेदन देऊन सिवरेज लाईन दुरुस्तीची मागणी केली. महिना झाला तरी प्रशासनाला जाग आलेली नाही, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.