प्रोफेशनल सलूनच्या नावाखाली देहव्यापार; पोलिसांचा छापा, आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 12:24 PM2021-12-13T12:24:10+5:302021-12-13T12:38:46+5:30
फॅमिली सलूनच्या नावावर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फॅमिली सलूनच्या आडून हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आरोपीला सामाजिक सुरक्षा विभागाच्या (एसएसबी) पोलिसांनी अटक केली. रवि दशानन चाैधरी असे आरोपीचे नाव असून, तो चुनाभट्टी अजनीतील एफसीआय गोदामाच्या बाजूला राहतो.
चाैधरी अजनी चाैकातील भवानी चेंबरमध्ये अनेक दिवसांपासून ‘रेडिफाइन द प्रोफेशनल फॅमिली सलून’ चालवित होता. येथे येणाऱ्या आंबटशाैकीन ग्राहकांना तरुणींकडून मसाज देऊन त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, शहरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला-मुलींना तो आपल्या सलूनमध्ये जागा उपलब्ध करून देत होता. ही माहिती कळाल्यानंतर, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीच्या पोलीस निरीक्षक कविता ईसारकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा लावला.
आरोपी रवि चाैधरीकडे शनिवारी दुपारी बनावट ग्राहक पाठवून त्याला वारांगणाबाबत विचारणा करण्यात आली. त्याने ३ हजारांत वारांगणा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली. ग्राहकाकडून रक्कम घेतल्यानंतर दोन वारांगणा त्याला दाखविण्यात आल्या. त्याच वेळी पोलिसांनी तेथे छापा घातला. आरोपी रवि चाैधरी, तसेच त्या वारांगणांना ताब्यात घेण्यात आले. चाैकशीनंतर वारांगणांना सोडून देण्यात आले, तर चाैधरीविरुद्ध अजनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वारांगणेला पाचशे रुपये
आरोपी चाैधरी त्याच्याकडे असलेल्या वारांगणेला एका ग्राहकाचे केवळ पाचशे रुपये देत होता. तीन-चार ग्राहक, अर्थात दिवसभरात दोन हजारांपर्यंत रक्कम हाती पडत असल्याने चाैधरीच्या संपर्कात अनेक वारांगणा असायच्या. शनिवारी त्याच्या सलूनमध्ये पोलिसांनी छापा घातल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन वारांगणांपैकी एक परितक्त्या आहे, तर दुसरी घरच्यांना अंधारात ठेवून हा व्यवसाय करीत असल्याचे पुढे आले आहे.