हॉटेल अर्जुनमध्ये सेक्स रॅकेट
By Admin | Published: December 28, 2014 12:36 AM2014-12-28T00:36:25+5:302014-12-28T00:36:25+5:30
हॉटेलच्या आडोशाने गेल्या अनेक वर्षांपासून चालविला जाणारा गणेशपेठमधील पॉश कुंटणखाना शोधून गुन्हे शाखेच्या पथकाने तीन मुलींना ताब्यात घेतले. त्यात एक मुंबईची आहे.
वारांगना दलाल गजाआड : मुख्य सूत्रधार फरार
नागपूर : हॉटेलच्या आडोशाने गेल्या अनेक वर्षांपासून चालविला जाणारा गणेशपेठमधील पॉश कुंटणखाना शोधून गुन्हे शाखेच्या पथकाने तीन मुलींना ताब्यात घेतले. त्यात एक मुंबईची आहे. या प्रकरणी लॉजचा व्यवस्थापक आणि एका दलालाला पोलिसांनी अटक केली. नागपुरातील अनेक हॉटेल आणि लॉजमध्ये वेश्या पुरविणारा सचिन सोनारकर मात्र फरार झाला असून, पोलीस त्याचा ठिकठिकाणाचा शोध घेत आहेत.
गणेशपेठ बसस्थानकाजवळ अर्जुन हॉटेल आहे. येथे वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो, अशी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला त्याची माहिती कळली. ठिकठिकाणच्या अनेक वेश्या बोलवून हॉटेल लॉजमध्ये पुरविणाऱ्या सचिनने मुंबईहून एक वारांगणा बोलविल्याचे कळताच गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे पोलिसांचा ग्राहक शुक्रवारी रात्री ७ वाजता अर्जुन हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने व्यवस्थापक चेतन सारंग सातपुते (वय २७, रा. कॉर्पोरेशन कॉलनी, नागपूर) याच्याशी संपर्क साधला. त्याने चार हजार रुपयात तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. बोलणी पक्की केल्यानंतर मनीष बाबूराव रामटेके (वय २१, रा. संजयनगर, पांढराबोडी) याने तीन तरुणींना ग्राहकांसमोर आणले.
त्यांना रूममध्ये नेल्यानंतर ग्राहकाने बाजूलाच दबा धरून बसलेल्या पोलिसांना संकेत दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, एपीआय अमिता जयपूरकर, पाटील, एएसआय मदने, हवालदार पांडुरंग निकुरे, प्रकाश सिडाम, मुकुंदा, गोपाल वैद्य, अजय घाटोळ, संजय पाटील, योगेश घोडकी, प्रकाश बोंदरे, सुरेश पंधरे, नीलेश आणि रेवतकर तसेच महिला शिपाई अनिता धुर्वे, सुरेखा सांडेकर, अस्मिता मेश्राम आणि सामाजिक कार्यकर्त्या नंदा भोयर यांनी हॉटेलमध्ये धाड घातली. त्या तीनही मुली तसेच व्यवस्थापक चेतन आणि दलाल मनीष या दोघांना ताब्यात घेतले.(प्रतिनिधी)
सचिन सोनारकर फरार
वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा सचिन सोनारकर फरार झाला. ताब्यात घेतलेल्या तरुणींमध्ये एक तरुणी मुंबईची होती. चार दिवसांपूर्वी तिला सचिन सोनारकरने ५ हजार रुपये प्रति दिवस देण्याचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी नागपुरात आणले होते. तिला त्याने रामनगरातील आपल्या फ्लॅटवर मुक्कामी ठेवले होते. मागणीनुसार, तो तिला विविध ठिकाणी पाठवत होता. त्याच्याकडे ४० ते ५० वारांगना आणि शेकडो ग्राहकांचे पत्ते व मोबाईल नंबर असल्याचे पोलीस निरीक्षक पवार सांगतात. तो गेल्या अनेक वर्षांपासून या धंद्यात सक्रिय असून, महिन्याला तो २५ ते ३० लाख रुपये मिळवतो, असेही पोलिसांना कळले आहे. कमाल चौकात राहाणाऱ्या सचिनने नागपुरात विविध भागात तीन पॉश सदनिका घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडून या कामासाठी वापरण्यात येणारी इंडिगो कार पोलिसांनी जप्त केली.