नागपुरात नॅचरोपॅथी सेंटरच्या नावावर ‘सेक्स रॅकेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 08:58 PM2018-03-16T20:58:36+5:302018-03-16T22:42:37+5:30
खरे टाऊन धरमपेठ येथे नॅचरोपॅथी सेंटरच्या नावावर सुरू असलेला ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकून अड्ड्याच्या सूत्रधारासह तीन आरोपीला अटक केली. तर त्यांच्या जाळ्यातून आठ मुलींना मुक्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरे टाऊन धरमपेठ येथे नॅचरोपॅथी सेंटरच्या नावावर सुरू असलेला ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकून अड्ड्याच्या सूत्रधारासह तीन आरोपीला अटक केली. तर त्यांच्या जाळ्यातून आठ मुलींना मुक्त करण्यात आले.
रजत सुभाष ठाकूर (२३) रा. वैशालीनगर हिंगणा रोड, स्वप्नील विजय गुप्ता (२२) रा. बालाजीनगर हिंगणा रोड आणि शरद पुरुषोत्तम नंदेश्वर (२८) वैशालीनगर पाचपावली अशी आरोपीची नावे आहे. रजत व स्वप्नील हे या अड्ड्याचे मुख्य सूत्रधार आहे. दोघेही खरे टाऊन येथील सरस्वती अपार्टंमेंट आणि अवंती अपार्टमेंटमध्ये नॅचरोपॅथी सेंटरच्या नावावर देह व्यापाराचा अड्डा चालवित होते. त्यांनी शरद नंदेश्वरला मॅनेजर म्हणून ठेवले होते.रजत व स्वप्नील अनेक दिवसांपासून देह व्यापारात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांची कमतरता नव्हती. फोनच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्याशी संपर्क साधत होते. ग्राहकाच्या कुवतीनुसार मुलींची किमत वसुल केली जात होती. गेल्या वर्षभरापासून दोन्ही ठिकाणी देह व्यवसाय सुरू होता.
खरे टाऊन हा उच्चभ्रू लोकांचा परिसर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घर सुद्धा याच वस्तीत आहे. त्यामुळे संशयास्पद हालचाली चटकन लक्षात येतात. काही दिवसांपासून येथील नागरिकांना सरस्वती अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये असलेल्या नॅचरोपॅथी सेंटरमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा संशय आला. सामाजिक सुरक्षा पथकालाही याची चाहुल लागली. पथकाने या अड्ड्यावर गुरुवारी सायंकाळी डमी ग्राहक पाठवला. आरोपीनी एका तरुणीचा सौदा करताच पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा रजत व स्वप्नील हा चार तरुणीसोबत सापडला. पोलिसांनी जेव्हा मुलींना विचारपूस केली तेव्हा त्यांनी अवंती अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये सुद्धा अड्डा सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेच तिथेही धाड टाकली. तेथून शरद हा चार मुलींसोबत होता.
आरोपी एका वर्षापासून दोन्ही अड्डे चालवित होते. पीडित तरुणींचे म्हणणे आहे की, त्यांना नॅचरोपॅथीच्या बहाण्याने कामावर ठेवण्यात आले होते. नंतर ग्राहकांना खूश करण्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यामुळे त्या देह व्यापार करण्यास तयार झाल्या.आठ तरुणींपैकी एक मिरज येथील राहणारी असून इतर स्थानिक असल्याचे सांगितले जात आहे. परंतु स्वत:ची ओळख लपविण्यासाठी मुली खोटी माहिती देत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सीताबर्डी पोलिसांनी पीटा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला १९ मार्च र्पयत ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई उपायुक्त श्वेता खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मीना जगताप, विक्रम गौंड, एपीआय संजीवनी थोरात, अमोल इंगळे, एएसआय अजय जाधव, पांडुरंग निकोरे, हवालदार दामोधर राजुरकर, विजय गायकवाड, अहमद, अनिल दुबे, शिपाई मंजू, छाया, पूनम आदींनी केली.
‘कोड वर्ड’चा वापर
पोलिसांना आरेपीजवळ डायरी सापडली. त्यात ग्राहक आणि मुलींच्या संबंधातील माहिती ‘कोड वर्ड’मध्ये लिहिली आहे. त्यामुळे दोघांची ओळख आणि मोबाईल नंबर समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
सूत्रनुसार आरोपी एक वर्षापासून दोन्ही फ्लॅटमध्ये देहव्यापार चालवित होते. मागील काही दिवसांमध्ये खरे टाऊन परिसर चर्चेत आला आहे. सीए परांजपे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी, हुक्का पार्लरवरील कारवाई अशा घटना घडल्या. ताज्या घटनांमुळे पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विश्वास बसल्यावरच प्रवेश
आरोपींनी दोन्ही अड्डे असे बनवले होते की पहिल्या नजरेत ते नॅचरोपॅथी सेंटर असल्याचेच वाटते. कोणताही नवीन ग्राहक आल्यास त्याला फ्लॅटसमोर असलेल्या बोगस नॅचरोपॅथी सेंटरमध्येच बसवले जाते. कुठलाही धोका नसल्याचे दिसून आल्यावरच त्याला आत प्रवेश दिला जात होता. दोन्ही फ्लॅटमध्ये तीन बेडरूम आणि केबीन बनलेले होते.