हायप्रोफाईल, तुमच्या नावाने सेक्स रॅकेट तर चालत नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 07:54 AM2021-06-28T07:54:35+5:302021-06-28T07:55:38+5:30
फेसबुकवर नाव तुमचे, फोटो हायप्रोफाइल सेक्स वर्कर्सचे
नरेश डोंगरे
नागपूर : तपास यंत्रणांसाठी डोकेदुखी अन् सर्वसामान्यांसाठी प्रचंड मन:स्तापाचा विषय ठरलेल्या सायबर गुन्हेगारांनी आता एक नवीच शक्कल शोधली आहे. ‘एस्कॉर्ट सर्व्हीस’च्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या या गुन्हेगारांनी विविध शहरातील प्रतिष्ठितांची फेसबूक आयडी हॅक करणे सुरू केले आहे. कुणाच्याही नावाची डमी फेसबूक आयडी तयार करून त्यावर ते देखण्या तरुणींचे फोटो अपलोड करतात.
अवघ्या महिनाभरात नागपुरात अशी तीन उदाहरणे उघड झाली आहे. त्याची माहिती कर्णोपकर्णी सर्वत्र पसरल्याने अनेकांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे.
यापूर्वी सायबर गुन्हेगारांनी लॉटरी लागल्याची, डेबिट-क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याची, केवायसी अपडेट करण्याची, कर्ज, नोकरी देण्याची थाप मारून अनेकांना गंडा घातला आहे. काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांनी ‘सेक्सटॉर्शन’ हा प्रकार सुरू करून व्हिडीओ कॉल करत ऑनलाईन सेक्सची ऑफर देत अनेकांचे कपडे उतरवले. तो व्हिडीओ नंतर संबंधित व्यक्तीला पाठवून त्याच्याकडून बदनामीचा धाक दाखवत लाखोंची रक्कम उकळली. आता ‘सोशल मीडिया हॅकिंग आणि सेक्सटॉर्शन’च्या साखळीतील नवीन प्रकार उजेडात आला आहे. तुम्ही कोणत्याही गावात, शहरातील असा. त्याच्याशी सायबर गुन्हेगारांना देणे-घेणे नाही. ते तुमचा वापर करून तुम्हाला म:नस्ताप देतात.
हीच ‘ती’ प्रकरणे
डमी फेसबूक आयडीचा गैरवापर करून सेक्स रॅकेटच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकाराची उपराजधानीत महिनाभरात तीन प्रकरण पुढे आलेली आहे. त्यातील एक मिहानमधील अधिकारी आहे. दुसरी व्यक्ती सामाजिक क्षेत्रात वावरणारी आहे. तर तिसरा उपराजधानीतील सांस्कृतिक क्षेत्राशी जुळलेला आहे.
बदनामीचा धाक, तक्रारीस नकार
nअसे अनेक गुन्हे घडत असले तरी बदनामीच्या धाकाने त्याची तक्रार करणारांची संख्या नगण्य आहे.
nसायबर पोलिसांकडेही अशी ओरड करत अनेक जण येत असले तरी बदनामीच्या धाकाने तक्रार मात्र नोंदवत नाहीत.
nसंबंधित पोलीस अधिकारी पीडिताची डमी फेसबूक आयडी डिलीट करून त्याचा मानसिक त्रास संपवतात अन् प्रकरण उघडही होत नाही.
सेक्स जॉब के लिये संपर्क करे
तुम्ही एखाद्या मोठ्या पदावर असाल, तुमची फेसबूक फॅन फॉलोईंग ठीकठाक असेल तर तुमची डमी फेसबूक आयडी हे गुन्हेगार तयार करतात. त्यावर तरुणींचे हॉट फोटो तसेच संपर्क क्रमांक दिला जातो. त्यावर संपर्क केल्यास मधूर आवाजातील ललना तुम्हाला जाळ्यात ओढते आणि नंतर तुम्हाला बदनामीचा धाक दाखवून तुमची आर्थिक पिळवणूक करते.