सलूनच्या आड सेक्सवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:11 AM2021-08-23T04:11:11+5:302021-08-23T04:11:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सलूनच्या आड हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलूनच्या आड हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. त्याची गर्लफ्रेण्ड मात्र पळून गेली. या कुंटणखान्यावर वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीसह दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सागर देवराव काजनीकर (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आणि त्याची मैत्रीण नितू कोहाड या दोघांनी चार महिन्यांपूर्वी मेडिकल चाैकातील अर्जुन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रमिला कृष्णराव कोहाड नामक महिलेच्या सदनिकेत सलून सुरू केले होते. सलूनच्या आड सागर आणि नितू वेश्याव्यवसाय चालवित होते. ही माहिती कळल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहानिशा करून घेतली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ग्राहक पाठवून दोन हजारांत वारांगनाची बोलणी केली. ग्राहकाने संकेत देताच पोलिसांनी या कुंटणखान्यावर छापा मारला. तिसऱ्या माळ्यावर चालणाऱ्या या कुंटणखान्यावर पोलिसांना दोन वारांगना आढळल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जबाब नोंदविला. त्यानंतर आरोपी सागर तसेच नितूविरुद्ध इमामवाडा पोलीस ठाण्यात पोक्सो आणि पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सागरला अटक केली. नितूचा शोध घेतला जात आहे.
----
मध्य प्रदेशातून पोहोचली नागपुरात
त्यात एक १६ वर्षांची आणि दुसरी २२ वर्षांची आहे. १६ वर्षीय वारांगना मध्य प्रदेशातील आहे. सागरने तिला काही दिवसांपूर्वीच वेश्याव्यवसायासाठी नागपुरात बोलवून घेतले होते. पोलीस निरीक्षक भोसले, उपनिरीक्षक मंगला हरडे, हवालदार सुनील इंगळे, शिपाई भूषण झाडे, मनीष रामटेके, रिना जाऊरकर यांनी ही कामगिरी बजावली.
----