मेडिकलचा डॉक्टर फसला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात; ब्लॅकमेल करून घातला १.७५ लाखांना गंडा
By योगेश पांडे | Published: August 26, 2022 06:38 PM2022-08-26T18:38:47+5:302022-08-26T18:42:13+5:30
संबंधित २६ वर्षीय डॉक्टर मेडिकलमध्ये असताना त्याला फेसबुकवर पायल नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर त्यांचे चॅटिंग सुरू झाली. तरुणीने डॉक्टरला भुरळ घातली.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टर ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकला. ‘सोशल मीडिया’वर अनोळखी तरुणीशी अश्लिल चॅटिंग करणे त्याला महागात पडले व बदनामीच्या भीतीपोटी त्याला पावणेदोन लाख रुपयांची खंडणीच द्यावी लागली. या प्रकरणात अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित २६ वर्षीय डॉक्टर मेडिकलमध्ये असताना त्याला फेसबुकवर पायल नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर त्यांचे चॅटिंग सुरू झाली. तरुणीने डॉक्टरला भुरळ घातली व सेक्स चॅटिंग करण्यास तयार असल्याचे सांगितले. डॉक्टरदेखील तयार झाला व त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. २० ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पायलने डॉक्टरला मॅसेज केला व दोघांनीही अश्लिल चॅटिंग केली. त्यानंतर दोघांनीही व्हिडीओ कॉलवर बोलण्यास सुरुवात केली. व्हिडीओ कॉलदरम्यान तरुणीने स्वत:चे कपडे काढले. डॉक्टरने त्यास नकार दिला. मात्र त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा असताना तिने स्क्रीनशॉट काढून ठेवला. दुसऱ्या दिवशी पायलने डॉक्टरला फोन घेण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. त्याबदल्यात रात्री पुन्हा व्हिडिओ चॅटिंग करण्याचे तिने आमिष दाखवले. डॉक्टरने लगेच तिच्या बँक खात्यात १० हजार रुपये टाकले. मध्यरात्री पुन्हा डॉक्टर आणि पायलने अश्लील व्हिडिओ कॉलिंग केले. पायलने तो व्हिडिओ रेकॉर्ड केला.
दुसऱ्या दिवशी डॉक्टरच्या मोबाईलवर तो व्हिडिओ टाकला. त्याने पायलला फोन करून या प्रकाराबद्दल विचारणा केली. तिने व्हिडिओ डिलिट करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर त्याचे मेडिकलमधील मित्र, नातेवाईक यांना व्हिडीओ पाठविण्याची तिने धमकी दिली. तसेच पोलिसांत तक्रार करण्याचीदेखील भीती दाखविली. बदनामीच्या भीतीपोटी डॉक्टरने लगेच पैसे तिच्या खात्यात टाकले. त्यानंतर परत तिने पैशांची मागणी केली. वारंवार धमकी देत तिने डॉक्टरकडून १ लाख ७५ हजार रुपये उकळले. त्यानंतरही ती पैसे मागत होती. मात्र डॉक्टरने तिचा नंबर ब्लॉक केला. तिने दुसऱ्या क्रमांकावरून फोन करण्यास सुरुवात केली. अखेर डॉक्टरने अजनी पोलीस ठाणे गाठले व आपबिती सांगितली. पोलिसांनी फसवणूक व आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.