‘सेक्सटॉर्शन’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; नग्न व्हिडीओ कॉल अन् ब्लॅकमेलिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 03:02 PM2021-06-09T15:02:57+5:302021-06-09T15:04:30+5:30
Wardha News सध्या ‘सेक्सटॉर्शन’चा नवा फंडा वापरून अनेकांना लाखाेंचा गंडा घालण्याचा सपाटाच सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्वसामान्यांना मोठमोठ्या सेेलिब्रिटी, व्यापारी, उद्योजकांना गंडा घालण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून अनेक युक्त्या वापरल्या जातात. सध्या ‘सेक्सटॉर्शन’चा नवा फंडा वापरून अनेकांना लाखाेंचा गंडा घालण्याचा सपाटाच सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे. समाजातील इभ्रतीला घाबरून अशा घटनांमध्ये फसविले गेलेले बहुतांश जण पोलिसात तक्रार देत नाहीत. सोशल मीडियातील फेक अकाउंटवरून गुन्हेगार डाव साधत असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे. वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा पूर्ण न होणे, कमी वयात झालेले लग्न, घटस्फोट, अधिकचा पैसा अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक सेक्सटॉर्शनला बळी पडत आहेत. अशा लोकांच्या मोबाइलवर सोशल मीडियाद्वारे एखाद्या सुंदर ललनेची अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येते. त्यानंतर, औपचारिक ‘चॅटिंग’ सुरू होते. काही कालावधी जाताच व्हिडीओ कॉलिंग सुरू होते. अश्लील हावभाव आणि संवाद रेकॉर्ड केले जातात. त्यानंतर पैशांची मागणी होते. नकार दिला तर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ आणि चॅटिंग व्हायरल करून बदनामी करायची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग केले जाते. अनेकजण गुन्हेगारांच्या दबावाला बळी पडतात आणि लाखो रुपयांना फसविले जातात.
सुरुवातीला या प्रकारच्या जाळ्यात सेलिब्रिटी, राजकारणी, इतर क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना ओढले जात होते. फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियातील ऍप्सचा वापर करून हा गोरखधंदा केला जातो. आता तर सेक्सटॉर्शनचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे.
गुन्हेगार ‘सेक्सटॉर्शन’ करण्यासाठी फेक अकाउंटचा वापर करतात. समाजातील इभ्रत, नाव खराब होऊ नये म्हणून लाखोंचा गंडा घातला गेलेले अनेकजण अशा गुन्ह्यांची तक्रार पोलिसात करत नाही. काहींनी तक्रार केली तरी गंडा घालायचे काम होताच सोशल मीडिया आणि बँक अकाउंट साफ करून गुन्हेगार पसार होतात. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर गुन्हे आणि पोलिसांची डोकेदुखी वाढू लागली आहे.
सेक्सटॉर्शनचे ग्रामीण व्हर्जन ‘हनी ट्रॅप’
सेक्सटॉर्शनचे ग्रामीण व्हर्जन म्हणजे हनी ट्रॅप. या प्रकारात महिलांचा वापर करून पैसेवाले सावज जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर, सावजाकडून पैसा उकळला जातो. प्रसंगी सावजाला बदनामीची धमकी दिली जाते. शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही हनी ट्रॅपचे लोण पसरत चालले आहे.
केस स्टडी-१
एका उच्च पदस्थाला फेसबुकवर सुंदर मुलीची रिक्वेस्ट आली. दोघांमध्येही चॅटिंग सुरू झाले. काही कालावधी उलटल्यावर व्हिडीओ कॉलिंगद्वारे दोघेही बोलू लागले. अश्लील फोटो, व्हिडीओ एकमेकाला दाखवू लागले. मात्र, काही दिवसांनी त्या उच्च पदस्थाला पैशांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी मिळाली. अखेर, बदनामीला घाबरून त्या पदस्थाने ७५ हजार रुपये देत स्वत:च फसवणूक करून घेतली.
केस स्टडी-२
शहरातील तरुण युवा नेता म्हणवून घेणाऱ्या एका राजकारण्यालाही हनी ट्रॅपची शिकार व्हावे लागले. त्याचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून पैशांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. अखेर, बदनामीच्या भीतीने लाखो रुपयांनी त्याची फसगत झाली. बदनामी झेलत पोलिसात तक्रार मात्र दिली नाही.
केस स्टडी-३
एका सराफा व्यावसायिकाने अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग झाले. अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला. पण, बदनामीच्या भीतीने व्यावसायिकाला ५० हजारांनी गंडा घातला.
सायबर सेलमध्ये १० तक्रारी दाखल
सध्या सेक्सटॉर्शनचे लोण पसरत चालले असून अनेकजण बळी पडत आहेत. सायबर सेलकडे मागील दीड वर्षाच्या काळात तब्बल ८ ते १० तक्रारी दाखल झाल्याची माहिती आहे. मात्र, अशी अनेक प्रकरणे आहे की, त्यात बदनामी होण्याच्या भीतीने पोलीस ठाण्याची पायरी चढत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.
कोणत्याही अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. स्वीकारल्यास त्यांना व्हॉट्सॲप क्रमांक देऊ नये. कुठलीही वैयक्तिक माहिती देऊ नका. खासगी विषयावर कुठलाही संवाद करू नका. अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हिडीओ कॉल स्वीकारू नका. असे केल्यास तुमचा व्हिडीओ कॉल आणि स्क्रीनशॉट काढून तुम्हाला बदनाम करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी होईल. त्यामुळे अशा फसव्या कॉलपासून अधिक सतर्क राहा.
नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण शाखा
..................................