नागपुरात पोटच्या मुलींचा लैंगिक छळ; अल्पवयीन मुलींची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 10:33 PM2020-11-20T22:33:02+5:302020-11-20T22:33:27+5:30
Crime Nagpur News Abuse पत्नीच्या निधनानंतर मुलींवर वाईट नजर टाकून त्यांचा वर्षभरापासून लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाच्या पापाचा बोभाटा होताच मोमिनपुरा भागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. तहसील पोलीस ठाण्यात या प्रकरणी पीडित मुलींनी शुक्रवारी सायंकाळी तक्रार नोंदवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीच्या निधनानंतर मुलींवर वाईट नजर टाकून त्यांचा वर्षभरापासून लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाच्या पापाचा बोभाटा होताच मोमिनपुरा भागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. तहसील पोलीस ठाण्यात या प्रकरणी पीडित मुलींनी शुक्रवारी सायंकाळी तक्रार नोंदवली.
तहसील पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपी ३८ वर्षांचा आहे. तो ऑटो चालवतो. त्याच्या पत्नीचे दीड वर्षापूर्वी निधन झाले. त्याला १३ आणि १४ वर्षांच्या दोन मुली आहेत. पत्नीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच त्याची विकृती जागी झाली आणि त्याने आधी १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण सुरू केले. त्यानंतर त्याने दुसरे लग्नही केेले. मात्र, लग्नानंतर या नराधमाने त्याच्या १४ वर्षीय मुलीवर डोळा फिरवला. जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने दोन्ही बहिणी गप्प होत्या. या नराधमाच्या कुकृत्याची माहिती कळताच ती हादरली. तिलाही एक मुलगी असल्याने तिच्यासोबतही तो असेच करू शकतो, या शंकेने तिने घर सोडले. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने मुली घरीच राहत असल्याने या नराधमाची विकृती आणखीच वाढली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही मुलींचे वर्तन, संशयास्पद वाटल्याने मामीने त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर अन्य नातेवाईकांना कळविले. नातेवाईकांनी पीडित मुलींना दिलासा देऊन सामाजिक कार्यकर्त्यांची मदत मिळवली. शुक्रवारी दुपारी त्यांनी पीडित मुलींना घेऊन तहसील पोलीस ठाणे गाठले. जन्म देणारा बापच विकृती करीत असल्याची कैफियत पीडित मुलींनी गुदरली. त्यानंतर तहसील पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली. नंतर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस ठाण्यासमोर संताप
तक्रार मिळाल्यानंतर तहसील पोलिसांनी या नराधमाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपी राहत असलेल्या परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येत संतप्त नागरिक पोलीस ठाण्याच्या आवारात पोहचले. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच या नराधमाचा निषेध करून त्याला फासावर टांगण्याची मागणी केली. कारवाईपूर्वी अशा नराधमांना जनतेच्या हवाली करावे, अशीही भावना व्यक्त केली.