नात्यातील मुलींचे लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:46+5:302021-07-02T04:06:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नात्यातील मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या भामट्याला बेदम चोप देऊन नातेवाइकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. तक्रारीनंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नात्यातील मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या भामट्याला बेदम चोप देऊन नातेवाइकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. बुधवारी दुपारी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. शुभम विश्वेश्वर धुंडे (वय २९) असे आरोपीचे नाव असून, तो मध्य प्रदेशातील सौंसर येथील रहिवासी आहे.
आरोपी धुंडेचे सौंसर येथे हॉटेल आणि ढाबा आहे. लकडगंजमध्ये त्याची चुलत बहीण, जावई आणि इतर नातेवाईक राहतात. त्यामुळे त्याचे नागपुरात नेहमी येणे-जाणे आहे. १४ मे रोजी तो नागपुरात आला होता. मुक्कामी असताना त्याने आपल्या चुलत बहिणीच्या मुलीचा तसेच तिच्या सोबत आणखी एका मुलीसोबत लज्जास्पद वर्तन केले. नंतर तिला मोबाइलही विकत घेऊन दिला. त्यानंतर तो या दोन्ही मुलींच्या नेहमी ऑनलाइन संपर्कात होता. अश्लील व्हिडिओ, फोटो पाठविणे, चॅट करणे असे प्रकार सुरू झाले. १३ जूनला मुलीच्या आईला तिच्याजवळ मोबाइल दिसला. महागडा मोबाइल तुझ्याकडे कसा आला, अशी विचारणा केली असता तिने काकूच्या भावाने मोबाइल घेऊन दिल्याचे सांगितले. त्यानंतर मोबाइलची तपासणी केली असता त्यात आक्षेपार्ह प्रकार आढळले. त्यामुळे नातेवाइकांनी दोन्ही मुलींना खोदून खोदून विचारले, तेव्हा हा गैरप्रकार उघड झाला. नातेवाइकांनी आरोपी धुंडेला नागपुरात बोलवले. बुधवारी तो आला असता त्याला यासंबंधाने विचारपूस केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दोन्ही मुलींना समोर उभे करून मोबाइल दाखवला असता तो निरुत्तर झाला. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी त्याची बेदम धुलाई केली आणि त्याला चोपतच पोलीस ठाण्यात आणले. ठाणेदार पराग पोटे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार कलम ३५४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.
---
कपिलनगरातही विनयभंग
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आरोपी मिलन शेषराव सहारे (वय ४५) याने शेजारच्या २१ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवले. २१ जून ते १० जूनच्या दरम्यान हा प्रकार घडला. तरुणीने बुधवारी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू आहे.
---