नागपुरातील गॅगस्टर आंबेकरकडून लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 08:38 PM2019-10-19T20:38:22+5:302019-10-19T20:53:58+5:30
बदनामीचा धाक, मारण्याची धमकी आणि पैशाचे प्रलोभन देऊन एका २३ वर्षीय तरुणीचे गॅगस्टर संतोष आंबेकरने आठ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बदनामीचा धाक, मारण्याची धमकी आणि पैशाचे प्रलोभन देऊन एका २३ वर्षीय तरुणीचे गॅगस्टर संतोष आंबेकरने आठ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत पीडित तरुणीने संपर्क साधून तक्रार दिली. त्यात ती १५ वर्षांची असतानाच संतोषने तिचे लैंगिक शोषण केल्याचे नमूद केले आहे. या धक्कादायक घडामोडीमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, लकडगंज पोलीस ठाण्यात संतोषविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार विनयभंग करणे, बलात्कार करणे आणि धमकी देण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.
कुख्यात संतोष सध्या ५० वर्षांचा आहे. तर, तक्रार करणारी तरुणी २३ वर्षांची आहे. ती लकडगंजमध्ये राहते. संतोषच्या घराजवळ असलेल्या शाळेत आठ वर्षांपूर्वी (१५ वर्षांची असताना) ती शाळेत जात येत असताना संतोष तिला थांबवायचा आणि विचित्र इशारे करून बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर तो तिच्या मोबाईलवर सातत्याने संपर्क करून तिला स्वत:सोबत बोलायला भाग पाडत होता. यावेळी तो तिच्यासोबत लज्जास्पद भाषेत बोलायचा. ती १९ वर्षांची झाल्यानंतर (सन २०१५ मध्ये) तो तिला स्वत:च्या इतवारीतील घरी, घरासमोर असलेल्या ऑफिसमध्ये बोलवायचा. वेगवेगळे बहाणे करून तिला कधी मुंबईतील घाटकोपरमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये तर कधी बंगळुरूमधील अमन वन या रिसोर्टमध्ये नेऊन त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. कधी बदनामीचा धाक दाखवायचा तर कधी कुणाला काही सांगितल्यास तुला सोडणार नाही, म्हणून धमकी द्यायचा. तिला भेटवस्तू आणि पैशाचे प्रलोभन दाखवून २०१५ पासून ११ ऑक्टोबरपर्यंत संतोषने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले. त्याची तात्काळ दखल घेत वरिष्ठांनी शुक्रवारी रात्री लकडगंज ठाण्यात संतोषविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार विनयभंग करणे, बलात्कार करणे आणि धमकी देण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी डॉनला घेरले
संतोष आंबेकर नागपूरच नव्हे तर विदर्भातील गुन्हेगारांचा मास्टर माईंड समजला जातो. संतोषला नागपूर-विदर्भातील गुन्हेगार डॉन म्हणतात. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचे कटकारस्थान, अपहरण, खंडणी वसुली, जागा बळकावणे, फसवणूक करणे, धमक्या देणे, आदी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दहशत निर्माण करून संतोषने कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे. महिन्याला लाखोंची खंडणी येत असल्याने त्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. पैशाचा आणि दहशतीचा वापर करून तो त्याच्याविरुद्ध बोलणाऱ्यांचे तोंड बंद करीत होता.
पहिल्यांदाच ठोस कारवाई
अनेक पोलिसांसोबत मधूर संबंध निर्माण करणाऱ्या संतोषने मध्यंतरी राजकीय आश्रयही मिळवला होता. त्यामुळे पोलीस त्याच्याविरुद्ध ठोस कारवाई करीत नव्हते. मात्र पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नागपुरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना खुली सुट दिली. गुन्हे शाखेची धुरा कर्तव्यकठोर अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या हाती दिली. त्याचमुळे संतोष आंबेकरसारख्या कुख्यात गुंडाची भर चौकातून पायी वरात काढण्याची हिंमत पोलीस दाखवत आहेत.