नागपुरात निराधार तरुणीचे लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:27 PM2019-06-15T22:27:22+5:302019-06-15T22:28:29+5:30
एका निराधार तरुणीला प्रेमपाशात अडकवून लग्नाचे आमिष दाखवत एका आरोपीने तिचे सहा महिने लैंगिक शोषण केले. दरम्यान तिच्याकडून त्याने अडीच ते तीन लाख रुपये हडपले आणि आता लग्नास नकार देऊन तिला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या धोकेबाजीमुळे पीडित तरुणीने सदर पोलीस ठाण्यात आरोपी मोहित जितेंद्र देसाई (वय २८) याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका निराधार तरुणीला प्रेमपाशात अडकवून लग्नाचे आमिष दाखवत एका आरोपीने तिचे सहा महिने लैंगिक शोषण केले. दरम्यान तिच्याकडून त्याने अडीच ते तीन लाख रुपये हडपले आणि आता लग्नास नकार देऊन तिला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या धोकेबाजीमुळे पीडित तरुणीने सदर पोलीस ठाण्यात आरोपी मोहित जितेंद्र देसाई (वय २८) याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली.
तीन वर्षांपूर्वी मित्र-मैत्रिणींसोबत फुटाळा तलावावर ती बर्थ डे सेलिब्रेट करीत असताना आरोपी मोहित तेथे आला. त्यावेळी तरुणीसोबत त्याची ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. तरुणीकडे बऱ्यापैकी रक्कम असल्याने तो तिला वेगवेगळे कारण सांगून तिच्याकडून पैसे मागू लागला. दोन अडीच वर्षांत त्याने तिच्याकडून अडीच ते तीन लाख रुपये घेतल्याचे तरुणीने सदर पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०१८ पासून तो तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. मोहितचा मित्र अभिषेक याचे सदरमधील छावणी भागात स्काईस बिल्डींगजवळ गोदाम आहे. तेथील पडक्या जागेत ते दोघे शरीरसंबंध प्रस्थापित करायचे. अलिकडे तो टाळत असल्याचे लक्षात आल्याने ५ जूनच्या रात्री तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली. आपली रक्कमही परत मागितली. आरोपीने लग्नास नकार देतानाच घेतलेले पैसेही परत करत नाही, असे म्हणून होईल ते करून घे, असे म्हटले. आरोपीने अश्लील शिवीगाळ करून तिला धमकीही दिली. त्यामुळे तरुणी शुक्रवारी सदर पोलीस ठाण्यात पोहचली. पीएसआय संध्या चव्हाण यांनी मोहितविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून त्याची पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. पुढील तपास सुरू आहे.
आरोपी मोहित देसाई पाचपावलीतील राणी दुर्गावती चौकाजवळ (महेंद्रनगर) राहतो. पीडित तरुणी (वय १९) पाचपावलीतच राहते. तिला आईवडील नाही. ती तिचा लहान भाऊ (वय १६) सोबत आजोबाकडे राहत होती. आजोबाची बऱ्यापैकी मालमत्ता आहे. त्यांचेही निधन झाल्याने आजोबाकडे असलेली रक्कम, मालमत्ता तरुणीच्या नावे झाली. नातेवाईक असले तरी तीच सर्व व्यवहार बघते. तिची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे ध्यानात घेऊनच आरोपी मोहितने तिच्यावर प्रेमजाळे फेकले असावे, असा संशय आहे.