नागपुरात एसीबीच्या अधीक्षकांविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:44 AM2018-12-05T00:44:41+5:302018-12-05T00:47:06+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक (उपायुक्त) पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एसीबीत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर मंगळवारी येथील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पातळीवर त्याची माहितीवजा चर्चा सुरू झाल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक (उपायुक्त) पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एसीबीत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर मंगळवारी येथील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पातळीवर त्याची माहितीवजा चर्चा सुरू झाल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महाराष्ट लोकसेवा आयोगामार्फत पोलीस दलात थेट उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून दाखल झालेले पाटील आधी सोलापुरात सेवारत होते. तेथून त्यांची बदली पुण्याला उपायुक्त म्हणून झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यात त्यांच्या कामावर नाराज असलेल्या पोलीस आयुक्तांनी त्यांचा सेवा अहवाल समाधानकारक नसल्याचे कळविल्याने त्यांची बदली पोलीस अधीक्षक पीसीआर म्हणून करण्यात आली. हे पद पोलीस दलात मानहानीचे मानले जाते. त्यामुळे की काय, पाटील यांनी अधीक्षक पीसीआर म्हणून पद स्वीकारण्याचे टाळले. त्यानंतर काही दिवसातच त्यांची एसीबीचे उपायुक्त म्हणून नागपुरात बदली झाली. राजकीय वजन वापरून त्यांनी ही बदली करून घेण्यात यश मिळवल्याचे त्यावेळी पोलीस दलात बोलले जात होते. गेल्या दीड वर्षांपासून ते नागपुरात कार्यरत आहेत. त्यांच्या अधिकारक्षेत्रात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एसीबीची कार्यालये येतात.
विनयभंगाची तक्रार करणारी महिला येथील एसीबीच्या कार्यालयात कर्तव्यावर आहे. तिच्या तक्रारीनुसार, वेगवेगळ्या कारणाने पाटील यांनी तिच्याशी सलगी साधण्याचे प्रयत्न केले. तिने प्रतिसाद दिला नाही म्हणून पाटील यांनी तिचा छळ चालवला. त्यामुळे तिने त्यांची तक्रार एसीबीच्या वरिष्ठांकडे केली. एका अधीक्षकावर महिला कर्मचाऱ्याकडून गंभीर आरोप लावला जात असल्याने एसीबीच्या महासंचालकांकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने मुंबईहून एसीबीच्या एसीपी दर्जाची महिला अधिकारी मंगळवारी नागपुरात पोहचली. त्यांनी येथील वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर तक्रारदार महिला कर्मचाऱ्यासह सदर पोलीस ठाणे गाठले. सदरमधील अधिकाऱ्याच्या कक्षात महिला कर्मचाऱ्याची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. दरम्यान, एका पोलीस अधीक्षकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
चर्चा अन् गोपनीयता !
पोलीस दल आणि खासकरून एसीबीसाठी प्रचंड लांच्छनास्पद ठरलेल्या या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधितांकडून स्थानिक पातळीवर कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. वरिष्ठ पातळीवर मात्र या घडामोडीने चर्चेचे रान पेटवले आहे. विशेष म्हणजे, पाटील गेल्या दोन महिन्यापासून एका वेगळ्या प्रकरणाच्या संबंधाने नागपुरात चर्चेला आले होते. या संबंधाने अधीक्षक पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाही.
मेसेज पाठवून बदनामी करण्याचीही धमकी
महिलेने पोलीस ठाण्यात सहा पानाचे तक्रारवजा बयान नोंदविले. त्यात पाटील वर्षभरापासून तिचा कसा छळ करीत होते, त्याची सविस्तर माहिती होती. पाटील केवळ कार्यालयातच तिला बोलत नव्हते तर ती घरी असताना तिला मेसेज, फोन करून संपर्कात राहण्यास सांगत होते. तिला तिचे फोटो पाठविण्याचा वारंवार आग्रह धरत होते. महिला कर्मचाऱ्याने विरोध नोंदवला असता पाटीलने तिला तुझ्या पतीला तुझे बाहेर अफेअर आहे, हे सांगेन तसेच बदनामी करेन, अशी धमकीही दिली होती. हा सर्व प्रकार कथन करतानाच मुंबईतील महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वातील विशाखा समितीसमोर पाटील यांनी पाठविलेले घाणेरडे मेसेजही दाखवल्याचे समजते. ते बघितल्यानंतरच विशाखा समितीतील चारही सदस्यांनी लगेच एसबीच्या महासंचालकांना अहवाल कळवून पाटीलविरुद्ध तक्रार दाखल करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास वरिष्ठ पातळीवरून परवानगी मिळाली. परिणामी केवळ विनयभंगाचे कलम ३५४ नव्हे तर या कलमासोबत पोलिसांनी लिखित धमकी (मेसेज) देण्याच्या आरोपावरून कलम ५०६, ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला.