कोरोनाच्या सावटातही होणार ‘अखंड ज्योत’ प्रज्वलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:47 AM2020-03-25T10:47:22+5:302020-03-25T10:52:40+5:30
तज्ज्ञ पुरोहितांकडून होम, हवन, यज्ञाचे आयोजन केले जाऊन कोरोनाचे संकट घालविण्याची व विश्वाला संकटातून मुक्त करण्याची प्रार्थनाही केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या महाभयंकर सावटात गर्दी टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे. त्याअनुषंगाने धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात आली आहेत. अशा स्थितीत बुधवारपासून सुरू होत असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवही भाविकांच्या गर्दीशिवाय साजरा होत आहे. मंदिर प्रशासनांकडून खबरदारी घेतली जात असून, भाविकांना त्यांच्या अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करण्यासाठी विशेष व्यवस्थाही केली जात आहे.
हिवाळ्यात येणाऱ्या अश्विन नवरात्राप्रमाणेच देवीच्या सर्व देवालयांमध्ये चैत्र नवरात्रोत्सवाची धूम असते. अखंड ज्योत प्रज्वलित केल्या जात असतात आणि त्या भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. मात्र, यंदा भाविकांना आपल्या मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून वेगळ्या तºहेचे आवाहन केले जात आहे. भाविकांनी अखंड ज्योतीसाठी निश्चित निधी प्रशासनाकडे अर्पण करून घरूनच देवीची आराधना करण्याचे आवाहन केले जात आहे. मंदिरांमध्ये पुरोहित आणि काही नेमलेल्या व्यक्तींकडेच अखंड ज्योतींची देखरेख करण्याची योजना करण्यात आली आहे. यासोबतच तज्ज्ञ पुरोहितांकडून होम, हवन, यज्ञाचे आयोजन केले जाऊन कोरोनाचे संकट घालविण्याची व विश्वाला संकटातून मुक्त करण्याची प्रार्थनाही केली जाणार आहे.
ज्यांचा देवावर विश्वास त्यांनी महामृत्यूंजय जपावा - वैद्य
: मानवाच्या अतिवादी वृत्तीमुळे सध्याचे संकट ओढवले आहे. त्यामुळे निसर्ग कोपला आहे. आपण निसर्गालाच भगवंत मानतो आणि जन्म आणि मृत्यूचा फेरा त्याच निसर्गाच्या अर्थात शिवतत्त्वात पूर्ण होतो. सध्याचे कोरोनाचे सावट, त्यातलाच एक भाग आहे. जो व्यक्ती यावर विश्वास ठेवतो त्याने या काळात महामृत्यूंजन महामंत्राचा जप करावा. सोबतच विष्णूसहस्त्रनाम ऐकत राहावे. हे सर्व मोबाईलवर डाऊनलोड होत असल्याने सहज उपलब्ध होत असल्याचे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.