शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पूल दहा दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 09:25 PM2019-02-08T21:25:01+5:302019-02-09T00:07:53+5:30
महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या रिच-२ कॉरिडोर अंतर्गत व्हेरायटी चौकजवळील शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलावर मेट्रोच्या ‘स्टील गर्डर ब्रिज’चे कार्य सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे उड्डाण पुलावरून वाहतूक १० दिवस बंद राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोनागपूर प्रकल्पाच्या रिच-२ कॉरिडोर अंतर्गत व्हेरायटी चौकजवळील शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलावर मेट्रोच्या ‘स्टील गर्डर ब्रिज’चे कार्य सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे उड्डाण पुलावरून वाहतूक १० दिवस बंद राहणार आहे.
जमिनीपासून १८.५ मीटर उंचीवर मेट्रोच्या दोन पिलरवर एकूण ४०० मीटर लांबीच्या स्पॅनसाठी होणाऱ्या या कार्यासाठी ४०० आणि २२० मेट्रिक टन क्षमतेच्या २ क्रेनचा वापर होणार आहे. कार्य होत असताना सतत जड लोखंडी साहित्याचा वापर होणार असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभागातर्फे कार्य पूर्ण होईपर्यंत आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पूल अस्थायी स्वरुपात बंद करण्यात आला आहे. संबंधित अधिसूचना वाहतूक विभागातर्फे जारी करण्यात आली आहे.
उड्डाण पूल बंद राहणार असल्याने मॉरिस कॉलेज टी- पॉईंट ते रहाटे कॉलनी चौकापर्यंत आवागमन करण्यासाठी वाहनचालकांनी उड्डाण पुलाखालचा मुख्य रस्ता अथवा अन्य पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोतर्फे करण्यात आले आहे. वाहनचालकांच्या सहकार्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॉफिक मार्शल आणि जलद कृती पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक विभागाचे अधिकारी कार्यरत असतील.
व्हेरायटी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक, विविध प्रतिष्ठाने, मॉल, शॉपिंग स्ट्रीट (मेन रोड) आणि सिटी बस स्टॉप असल्याने याठिकाणी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे याठिकाणी कार्य करणे एक प्रमुख आव्हान महामेट्रोपुढे आहे. वाहनचालकांना लवकर आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पूल पूर्ववत उपलब्ध करून देण्यासाठी याठिकाणी दिवसरात्र कार्य करून महामेट्रो १० दिवसातच कार्य पूर्ण करेल. संपूर्ण कार्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पूर्ण करण्यात येईल. कार्य पूर्ण होत असताना सुरक्षेची संपूर्ण जवाबदारी स्वीकारत सुरक्षा अधिकारी कार्यस्थळी उपस्थित असतील.
शहरात प्रकल्पाचे कार्य होत असतांना नागपूरकरांनी नेहमीच महामेट्रोला सहकार्य केले आहे. छत्रपती उड्डाण पूल जमीनदोस्त करतानादेखील महामेट्रोच्या कार्याची जाणीव नागरिकांना होती. तेव्हा आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावरील हे कार्यदेखील अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी उड्डाण पूल बंद असणार याची जाणीव ठेवत मेट्रो प्रकल्पाच्या कार्यसाठी नागरिक सहकार्य करतील, अशी अपेक्षा महामेट्रोतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.