नागपुरातील शहीद गोवारी उड्डाण पूल होतोय ‘ओव्हरलोड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:46 AM2020-11-09T10:46:36+5:302020-11-09T10:48:05+5:30
Shaheed Gowari flyover Nagpur News नागपुरातील महत्त्वाचा उड्डाण पूल असलेल्या आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर नियमांना धाब्यावर बसवून जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील महत्त्वाचा उड्डाण पूल असलेल्या आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर नियमांना धाब्यावर बसवून जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे या उड्डाण पुलावर ताण येत असून भविष्यात याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आश्चर्याची बाब म्हणजे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून कारवाईसाठी कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही.
उड्डाण पुलाच्या निर्मितीला २० वर्ष पूर्ण झाले आहेत. या उड्डाण पुलावरुन जड वाहनांना वाहतुकीला बंदी आहे. याशिवाय उंच व जड वाहनांची वाहतूक होऊ नये यासाठी उड्डाण पुलाच्या सुरुवातीला ‘बॅरिअर्स’देखील लावण्यात आले होते. अनेकदा हे ‘बॅरिअर्स’ जड वाहनांमुळेच तुटले. याचा फायदा जड वाहनाच्या चालकांकडून घेण्यात येत आहे. आता कुठलाही अडथळा नसल्याने ट्रक, बस बिनधास्तपणे वेगाने जातात.
उड्डाण पुलाची क्षमता ही ३० ते ४० टन वजन असलेल्या वाहनांची आहे. मात्र ५० टनांहून अधिक ओझे असलेले ट्रक्स यावरुन जातात. त्यामुळे या उड्डाण पुलाला धोका संभवतो. काही ठिकाणी जड वाहने गेल्यानंतर जास्त प्रमाणात कंपनेदेखील जाणवतात.
नवीन ‘बॅरिअर्स’ कधी ?
उड्डाण पुलाच्या दोन्ही दिशांच्या बाजूस उंची संदर्भातील ‘बॅरिअर्स’ लावणे अत्यावश्यक आहे. मात्र २०१७ पासून याबाबत पुढाकार घेण्यात आलेला नाही. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना ही बाब दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्दळीच्या वेळीदेखील वाहतूक
अगोदर रात्रीच्या सुमारास जड वाहने उड्डाण पुलाचा वापर करताना दिसून यायची. मात्र आता तर चक्क वर्दळीच्या वेळी दिवसादेखील जड वाहनांची वाहतूक होते. आश्चर्याची बाब म्हणजे यांचा वेगदेखील जास्त असतो. तरीदेखील या वाहनांवर कुठलीही कारवाई होत नाही. वाहतूक पोलिसांचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
उड्डाण पुलाच्या ‘स्ट्रक्चर’ला होऊ शकते नुकसान
उड्डाण पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीवर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता आहे. जड वाहनांमुळे पुलाच्या ‘आरसीसी स्ट्रक्चर’चे नुकसान होत आहे. जर मोठे नुकसान झाले तर पुढे धोका संभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उड्डाण पुलाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी, सचिव तेजिंदरसिंह रेणू, सहसचिव अमरजितसिंह चावला यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदनदेखील सादर केले.