शहीद गोवारी स्मारक व्हावे ऐतिहासिक वारसास्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:22 AM2019-11-23T00:22:21+5:302019-11-23T00:24:46+5:30
आदिवासी गोवारी बांधवांच्या बलिदानाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवारी बांधवांप्रमाणे त्यांच्या शहीद स्मारकालाही उपेक्षा सहन करावी लागत आहे.
निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी गोवारी बांधवांच्या बलिदानाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवारी बांधवांप्रमाणे त्यांच्या शहीद स्मारकालाही उपेक्षा सहन करावी लागत आहे. देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूरच्या हृदयस्थानी असलेल्या झिरो माईल परिसरात हे स्मारक आहे खरे पण समाजाप्रमाणे तेही उपेक्षित आहे. त्या स्मारकाचे नुतनीकरण करावे, गोवारी समाजाच्या इतिहासाचे, संस्कृतीचे दर्शन होईल अशाप्रकारे विकासित करावे आणि ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी समाजातील तरुणांकडून पुढे येत आहे.
समाजातील तरुण कार्यकर्ते जीवन आंबुडारे यांनी समाजाकडून पुढे येणाऱ्या या मागणीबाबत आपली भूमिका मांडली. आदिवासी म्हणून उल्लेखित असलेल्या गोवारी समाजाचा एक स्वतंत्र इतिहास आहे, स्वतंत्र संस्कृती आहे. मात्र पिढ्यान्पिढ्या अज्ञानी असलेल्या समाजाच्या संस्कृतीची कधी हवी तशी नोंद कुणी केली नाही किंवा कुणाकडून झालीही नाही. त्यामुळे या समाजाला बोगस आदिवासी ठरवून १९८५ साली त्यांच्या अस्तित्वाबाबत प्रश्न निर्माण केला गेला. याच गैरसमजामुळे लाखो गोवारी बांधवांना मोर्चा काढावा लागला आणि २३ नोव्हेंबर १९९४ सालचे ते हत्याकांडही घडले. ही खरेतर आमच्या समाजासाठी कलंकित घटना आहे. कदाचित इतिहास, संस्कृतीची नोंद झाली असती तर असा लढा द्यावा लागला नसता आणि अनेक पिढ्यांना अन्यायात जगावे लागले नसते. पण घडले ते घडून गेले, आतातरी ही चूक दुरुस्त व्हायला हवी.
गोवारींचे शहीद स्मारक झिरो माईल चौक म्हणजे उपराजधानीच्या हृदयस्थानी आहे. मात्र समाजाच्या उपेक्षेप्रमाणे त्याचीही उपेक्षा, हेळसांड होत आहे. त्या घटनेनंतर शहिदांचे स्मारक झाल्यावर सुरुवातीला शासनाकडून संघटनेला शहीद स्मृतिदिनाच्या आयोजनासाठी एक लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खर्चाची तरतूद केली जाते. मात्र आज अनेक वर्षे लोटूनही या निधीत वाढ करण्यात आली नाही. स्मारकावर पाणी, सभामंडप, खुर्च्या, रंगरंगोटी अशा सुविधांचा अभाव आहे. २५ वर्षापासून शहीद स्मारकाचे दगडी शिल्प जीर्ण झाले आहे. त्यामुळे शासनाने शहीद बांधवांची आणि त्यांचा वारसा चालविणाऱ्या समाजाची अवहेलना थांबवावी, अशी अपेक्षा आंबुडरे यांनी व्यक्त केली. शासनाद्वारे इतर समूहांना झुकते माप देते. त्यांच्या स्मारक, समाजभवनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते मग गोवारी स्मारकाची अशी हेळसांड का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या समस्येकडे तातडीने लक्ष घालून स्मारकाचे नुतनीकरण करावे. पाणी, बैठक व्यवस्था, सभामंडप, स्वच्छतागृह, प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गोवारी समाजाच्या इतिहास, संस्कृतीचे व्हावे दर्शन
शासनाने गोवारी बांधवाबाबत आजतरी असा दुजाभाव, सावत्रपणा ठेवू नये. गोवारी समाजाला स्वतंत्र इतिहास, संस्कृती आहे. स्मारकाच्या रुपाने येथे गोवारी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे छोटेखानी संग्रहालय साकारावे. येथे गोवारी जीवनदर्शन घडविणारी चित्रमालिका साकारावी, इतिहास मांडणारी आर्ट गॅलरी निर्माण करावी, जेणेकरून गोवारी समाजाचा इतिहास काळाच्या ओघात पुसला जाणार नाही आणि पुन्हा एखादे हत्याकांड घडणार नाही, अशी भावना जीवन आंबुडारे यांनी व्यक्त केली.