शहीद राजगुरू संघाचे स्वयंसेवक नव्हते: मा.गो.वैद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:46 PM2018-04-02T18:46:13+5:302018-04-02T18:46:20+5:30
शहीद राजगुरू हे संघाचे स्वयंसेवक असल्याची शक्यता ज्येष्ठ संघ विचारक व संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी नाकारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रांतीकारक शहीद राजगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याच दावा माजी प्रचारक नरेंद्र सहगल यांनी पुस्तकातून केल्यानंतर संघ वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. परंतु शहीद राजगुरू हे संघाचे स्वयंसेवक असल्याची शक्यता ज्येष्ठ संघ विचारक व संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी नाकारली आहे. राजगुरू संघाचे स्वयंसेवक असल्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, असे मा.गो.वैद्य यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भुमिका मांडली.
नरेंद्र सहगल यांनी त्यांच्या एका पुस्तकातून क्रांतीकारक राजगुरु संघाचे स्वयंसेवक होते व संघमुख्यालय असलेल्या मोहिते वाडा शाखेचे ते स्वयंसेवक असल्याचा दावा केला आहे. याबाबत मा.गो.वैद्य यांना विचारणा केली असता याबाबत ऐकले नसून आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या चरित्रातदेखील याचा उल्लेख नसल्याचा त्यांनी सांगितले. डॉ.हेडगेवार हे अनेक वर्ष कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे होते. त्यावेळी ती भूमी क्रांतीकारकांचे महत्त्वाचे केंद्र होती. त्यामुळे डॉ.हेडगेवार यांचे क्रांतीकारकांशी जवळचे संबंध होते. त्यामुळे क्रांतीकारक राजगुरु नागपुरात आले असतील तर त्यांच्या सुरक्षित निवासाची व्यवस्था डॉ. हेडगेवारांनी नक्कीच केली असेल, असेदेखील त्यांनी सांगितले.