शहीद शंकर महाले जयंती विशेष; 'रडू नकाेस, मी तुझ्या घरी पुन्हा जन्म घेईन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 07:10 AM2022-01-19T07:10:00+5:302022-01-19T07:10:02+5:30
Nagpur News स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यात एक नाव शहीद शंकर महाले यांचेही आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फासावर चढविले.
निशांत वानखेडे
नागपूर : स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात अनेक स्वातंत्र सैनिकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यात एक नाव शहीद शंकर महाले यांचेही आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फासावर चढविले; पण हा तरुण डगमगला नाही. फासावर जात असताना कुटुंबाचे सदस्य धायमाेकलून रडत हाेते. त्यावेळी शंकर यांनीच त्यांना धीर देत काकूला संबाेधले, ‘रडू नकाेस, मी तुझ्या घरी पुन्हा जन्माला येईन; पण बाेलणार काहीच नाही.’
शहीद शंकर महाले यांचे चुलत भाऊ गजाननराव महाले यांनी त्या आठवणी जागविल्या. शंकर हे वडील दाजिबा यांचे एकुलते एक पुत्र हाेते. दाजिबा यांच्या दाेन भावांपैकी माेरबाजी यांना पाच भाऊ व एक बहीण हाेती. त्यातीलच एक गजाननराव. ते मानेवाडा राेडवर जवाहरनगर येथे राहतात; पण त्यांचे कुटुंब आताही जुन्याच ठिकाणी नवाबपुरा येथे राहते. शंकर महाले यांच्या कथनानुसार वर्षभरानंतर काकूला दुसरा मुलगा झाला. कालांतराने हा मुलगा बाेलू शकत नाही, असे लक्षात आले. त्यामुळे घरच्यांना विश्वास वाटला की, कथनानुसार शहीद शंकर हाच आपल्या घरी जन्माला आला आहे. त्यामुळे त्याचे नाव शंकरराव असेच ठेवण्यात आल्याचे गजाननराव सांगतात.
पित्याला गाेळी लागली, पुत्र फासावर गेला
१९४२ च्या चले जाव आंदाेलनाचा निखारा नागपुरातही पडला हाेता. अनेक आंदाेलनकर्ते रस्त्यावर उतरले हाेते. त्यावेळी शहरात कर्फ्यू लावण्यात आला हाेता. दमनकारी इंग्रजांनी अनेक आंदाेलकांवर गाेळीबार केला. अशाच एका आंदाेलनात शंकर महाले यांचे वडील दाजिबा यांना शुक्रवारी तलावाजवळ गाेळी लागली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. शंकर हाही आंदाेलनात उतरला हाेता. या तरुणांनी नवाबपुरा येथील पाेलीस चाैकी जाळली आणि येथील एका जमादाराला मारले. इंग्रजांनी त्यांना पकडले. त्यावेळी त्यांचे वय अवघे १६ वर्षे हाेते. तेव्हा १७ पेक्षा कमी वयाच्या मुलाला फाशी देता येत नव्हती. हा खटला वर्षभर चालला आणि १९ जानेवारी १९४३ राेजी वयाच्या १७ व्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फाशी दिली. त्यावेळी ‘वडील गाेळीने गेले, पुत्र फासावर लटकला’, अशी म्हण प्रचलित झाली हाेती.
सुनेचा मुलीप्रमाणे विवाह लावला
इंग्रजांनी तुरुंगात डांबले तेव्हा जेमतेम चार महिन्यांपूर्वी शंकर महाले यांचा शेवंताबाई यांच्याशी विवाह झाला हाेता. त्यांचे वय जेमतेम १३ वर्षे हाेते. त्यामुळे या निरागस मुलीचे आयुष्य उजाड होण्यापेक्षा विवाह करावा, असा प्रस्ताव चुलत सासरे माेरबाजी यांनी घरी ठेवला. समाजाचा विराेध हाेता; पण कुटुंबाचे एकमत झाले. शंकर महाले शहीद झाल्याच्या वर्षभरानंतर माेरबाजी यांनी सुनेचा मुलीप्रमाणे विवाह लावून दिला. चार वर्षांपूर्वी नुकतेच शेवंताबाई यांचेही निधन झाल्याचे गजाननराव यांनी सांगितले.
पं. नेहरूंच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन
स्वातंत्र्यानंतर महाल परिसरात शहीद शंकर महाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक तयार करण्यात आले. या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांच्या हस्ते झाले हाेते. त्यावेळी त्यांच्यासाेबत लहान असलेल्या इंदिरा गांधी यादेखील आल्याची आठवण गजाननराव यांनी सांगितली.