शाहीर कलावंतांना कोरोनाचा फटका : मानधनही मिळाले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:47 PM2020-04-13T22:47:37+5:302020-04-13T22:51:18+5:30
ग्रामीण भागात आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे शाहीर कलावंत कोरोनामुळे अडचणीत सापडले आहे.या कलावंतांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहे. त्यामुळे कलावंतांनी उदरनिर्वाहासाठी शासन, प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागात आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे शाहीर कलावंत कोरोनामुळे अडचणीत सापडले आहे. उन्हाळ्याचे दिवस या कलावंतांसाठी सुगीचे दिवस असतात. ४ महिन्यात वर्षभराची कमाई करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोनामुळे या कलावंतांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहे. त्यामुळे कलावंतांनी उदरनिर्वाहासाठी शासन, प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
नागपूर जिल्ह्यात या कलावंतांची संख्या हजाराच्या जवळपास आहे. हे कलावंत खडी गंमत, तमाशा, भजन, कीर्तन, लावणी, डहाका या माध्यमातून ग्रामीण भागात कार्यक्रम करून समाजप्रबोधनाचे काम करतात. उन्हाळ्यात गावखेड्यांमध्ये या कलावंतांना मोठी मागणी असते. खेडेगावांमध्ये रात्ररात्रभर खडीगंमत, तमाशाचे फड रंगत असतात. यातून मिळणाऱ्या पैशातून या कलावंतांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. सध्या देशभरात कोरोनाचा कहर वाढतो आहे. लॉकडाऊनमुळे शहरच नाही तर गावेही ओसाड झाली आहेत. गावकऱ्यांनी तर गावेच्या गाव बंद केली आहेत. कुणी बाहेरून येणार नाही आणि गावचा कुणी बाहेर जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नागपुरातील प्रसिद्ध संस्था वैभव सांस्कृतिक कला मंडळ यांच्याकडे गावखेड्यातून कार्यक्रमाच्या नोंदणी झाल्या होत्या. त्यांचे सरावही सुरू झाले होते. पण फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दहशत चांगलीच वाढली त्यामुळे कलावंतांच्याहीअडचणी वाढल्या. वैभव सांस्कृतिक कला मंडळाचे सर्वच कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे आता या कलावंतांना जगण्याची कसरत करावी लागत आहे.
या कलावंतांना सरकारकडून मानधनाच्या रूपात काही पैसा मिळतो. परंतु गेल्या ४ महिन्यांपासून कलावंतांचे मानधनही बंद झाले आहे. शासनाने जगण्यासाठी शाहीर कलावंतांना कोरोना संपेपर्यंत मानधनापोटी काही निधी द्यावा, तसेच शासनाकडे थकीत असलेले मानधन लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी शाहीर निनाद बागडे, शाहीर नरहरी ऊर्फ नरेश वासनिक, ललकार शाहीर, राजकुमार गायकवाड, भजन गायक मंजूषा बागडे, शोभा वासनिक, शाहीर सिद्धार्थ, शाहीर राजेंद्र बावंकुदे यांनी निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.