शहिदांना माजी सैनिकांचे अभिवादन
By admin | Published: July 28, 2016 02:43 AM2016-07-28T02:43:41+5:302016-07-28T02:43:41+5:30
कारगील विजय’ ही भारतीय सैन्याची शौर्यगाथा. हा दिवस प्रत्येक भारतीयांची मनात सैन्यांप्रति आदर वाढविणारा.
उपराजधानीत कारगील विजय दिवस उत्साहात
नागपूर : ‘कारगील विजय’ ही भारतीय सैन्याची शौर्यगाथा. हा दिवस प्रत्येक भारतीयांची मनात सैन्यांप्रति आदर वाढविणारा. मंगळवारी कारगील विजय दिवस नागपुरातही विविध संघटनांच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र माजी वायुसैनिक कल्याण संघटनेच्यावतीने अजनी चौक, वर्धा रोडवरील शेरमन रणगाड्याजवळ सैनिकांना अभिवादन करून विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध माजी सैनिक संघटना, सैन्य अधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला सैनिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. येथील अमरज्योतीवर पुष्पचक्र अर्पण करून कारगील युद्धातील शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एका दहशतवाद्याला मारल्यामुळे पाकिस्तानाने काळा दिवस पाळला होता. पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करीत याच ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्री फटाके फोडून भारतीय सैन्याच्या कारवाईला जोरदार पाठिंबा जाहीर केला होता. कारगील विजयदिनीही या घटनेची आठवण करीत पाकिस्तानविरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. निवृत्त झालेल्या या सैनिकांनी पुन्हा सैन्यात सामील होऊन शत्रू राष्ट्राला आजही उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी सांगितले.सीमेबाहेरून शेजारील राष्ट्राच्या सैनिकांच्या किंवा दहशतवाद्यांच्या घुसखोऱ्या असोत की देशांतर्गत आपत्ती असो, भारतीय सैन्याने प्रत्येक वेळी आपल्या कामगिरीने देशवासीयांची मान गर्वाने उंचावली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कारगील युद्धातील जवानांची शौर्यगाथा त्याचेच प्रतीक होय. हा दिवस म्हणजे अभिमानाने ताठ मान करावी अशी भारतीय जवानांनी देशवासीयांना दिलेली संधी होय, असे प्रतिपादन प्रीती घारड यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)