शाहरुखखानसह दोघांना जामीन नाकारला
By admin | Published: January 19, 2017 02:48 AM2017-01-19T02:48:44+5:302017-01-19T02:48:44+5:30
पतंग पकडण्यावरून झालेल्या भांडणाचा सूड म्हणून एकाचा खून तर दुसऱ्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोन जणांचा
सत्र न्यायालय : पतंग पकडण्यावरून खुनाचे प्रकरण
नागपूर : पतंग पकडण्यावरून झालेल्या भांडणाचा सूड म्हणून एकाचा खून तर दुसऱ्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोन जणांचा जामीन अर्ज बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
शाहरुखखान सय्यद सरदारखान (१९) आणि शेख चांद शेख मोहम्मद (१९) दोन्ही रा. मोठा ताजबाग, अशी आरोपींची नावे आहेत. शेखर दामोदर वडतकर (३०) रा. जुनी बिडीपेठ, असे मृताचे नाव होते.
खुनाची ही घटना गतवर्षी १५ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आशीर्वादनगर येथील मोकळ्या मैदानात घडली होती.
प्रकरण असे की, या प्रकरणातील जखमी सागर रामदास गायकवाड (३०) रा. जुनी बिडीपेठ हा त्याचा मित्र शेखर वडतकर याच्यासोबत पतंग उडवीत होता. त्याच वेळी एक पतंग कटून येत असताना त्याला पकडण्यावरून शेखरचे ताजबाग येथील दोन मुलांसोबत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून या दोघांनी आपले आणखी सात साथीदार आणले होते. हे सर्व जण तीन मोटरसायकलींवर आले होते. त्यांनी या दोघांवरही सशस्त्र हल्ला करून शेखर वडतकर याचा जागीच खून केला होता, तर सागर गायकवाड याला गंभीररीत्या जखमी केले होते. सागरच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२, ३०७, १२० (ब), १४३, १४४, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हे दाखल करून नऊ जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी चार जण विधिसंघर्षग्रस्त बालके होती. कारागृहात असलेल्या या दोन आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला असता, प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक डी. एम. चंदन हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)