भिवापुरात शाेककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:09 AM2021-03-06T04:09:16+5:302021-03-06T04:09:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : छत्तीसगडमधील काेहकामेटा परिसरातील जंगलात काेम्बिंगदरम्यान नक्षल्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फाेटात इंडाे तिबेट बाॅर्डर पाेलीस (आयटीबीपी)चा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : छत्तीसगडमधील काेहकामेटा परिसरातील जंगलात काेम्बिंगदरम्यान नक्षल्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फाेटात इंडाे तिबेट बाॅर्डर पाेलीस (आयटीबीपी)चा मंगेश हरिदास रामटेके (४०, रा. सिद्धार्थनगर, भिवापूर) हा जवान शहीद झाला आहे. शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी या घटनेची माहिती मिळताच भिवापूर शहरात शाेककळा पसरली हाेती.
शहीद मंगेश यांचे वडील हरिदास वन विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, मंगेश यांची आई विजया, पत्नी राजश्री, भाऊ दिनेश व सात वर्षीय मुलगा तक्ष भिवापूर शहरातच वास्तव्याला आहेत. मंगेश यांचा विवाह २०१३ मध्ये झाला असून, तक्ष पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. धाकटा भाऊ दिनेशचे जुलैमध्ये लग्न असल्याने ते लग्नसमारंभाला येणार हाेते. जानेवारीमध्ये ते भिवापूर येथे येऊन कुटुंबीयांना भेटून गेले हाेते. बाेलका स्वभाव असल्याने ते मित्रांच्याही आवडीचे हाेते.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांचे पत्नीशी फाेनवर बाेलणेही झाले हाेते. आपण सध्या छत्तीसगडमधील काेहकामेटा परिसरातील जंगलात काेम्बिंगवर असल्याची माहिती त्यांनी पत्नीला दिली हाेती. एप्रिलमध्ये भिवापूरला येणार असल्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला हाेता. मात्र, नक्षल्यांनी केलेल्या स्फाेटात ते शहीद झाल्याची बातमी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कुटुंबीयांसह शहरवासीयांना कळली. बातमी कळताच कुटुंबीयांनी हंबरडा फाेडला.
...
भिवापूर बंदचे आवाहन
तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्यासह इतरांनी लगेच त्यांचे घर गाठून कुटुंबीयांचे सांत्वन केले. आप्तस्वकीयांनी कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी गर्दी केली हाेती. या घटनेत भिवापूर शहराने एक वीर जवान गमावला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी (दि. ६) भिवापूर बंदचे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल समर्थ यांनी केले आहे.