नागपूरच्या शैलजाने इराणला कबड्डीत केले आशियाई चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:07 AM2018-08-27T11:07:06+5:302018-08-27T11:07:54+5:30
जकार्ता आशियाई गेम्समध्ये इराणने भारताचा पराभव करीत महिला कबड्डीमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला असला तरी त्यांच्या या यशामध्ये भारतीय महिला प्रशिक्षकाचे योगदान आहे. ती महिला प्रशिक्षक नागपूरची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जकार्ता आशियाई गेम्समध्ये इराणने भारताचा पराभव करीत महिला कबड्डीमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला असला तरी त्यांच्या या यशामध्ये भारतीय महिला प्रशिक्षकाचे योगदान आहे. ती महिला प्रशिक्षक नागपूरची आहे. होय, आपण चर्चा करतोय ती शैलजा जैन यांची. विवाहापूर्वी शैलजा पद्माकर धोपाडे म्हणून त्यांनी नागपूर विभागात कबड्डीमध्ये छाप सोडली आहे.
आव्हान स्वीकारणे आवडते
कबड्डी जगतात चर्चेत असलेल्या मराठा लॉन्सर्सची दिग्गज खेळाडू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शैलजाला बालपणापासून आव्हान स्वीकारणे आवडत होते. त्यामुळे मुलींना मैदानावर पाय ठेवणेही मोठी बाब मानल्या जाणाºया ७० च्या दशकात सेंट उर्सुलाच्या या विद्यार्थिनीने कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बॉस्केटबॉल, व्हॉलिबॉल यासारख्या खेळांमध्ये नशीब आजमावल्यानंतर शैलजाने तत्कालीन प्रशिक्षक दिनूभाऊ शिर्के आणि राजाभाऊ समदूरकर यांच्यासारख्या अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीमध्ये कारकीर्द करण्याचा संकल्प केला आणि मराठा लॉन्सर्स क्लबला हळूहळू राष्ट्रीय पातळीवर आपल्या मेहनतीच्या जोरावर ओळख मिळवून देण्यात यशस्वी ठरली. दरम्यान शैलजाने बेंगळुरूमधून एनआयएस प्रशिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण केले.
अशी झाली इराण संघाची प्रशिक्षक
शैलजा राज्य क्रीडा विभागात क्रीडा प्रशिक्षक म्हणून आपली सेवा देत होती, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीच्या उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची तिची इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. ज्यावेळी तिला भारतीय संघासोबत जुळता आले नाही त्यावेळी तिने इराणसारख्या संघासोबत जुळण्याचा प्रयत्न केला.
२०१४ मध्ये तिला इराण संघाकडून आमंत्रणही मिळाले, पण राज्य सरकारची कर्मचारी असल्यामुळे आमंत्रण स्वीकारणे शक्य झाले नाही. पण २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर शैलजा इराण कबड्डी संघासोबत जुळली आणि आपल्या अनुभव व दृढनिश्चयाच्या जोरावर इराण संघाला हे यश मिळवून दिले.
उत्साह वाढविण्यात आईचे विशेष योगदान
प्रत्येक पाल्याच्या यशामध्ये त्याच्या आईवडिलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. शैलजासाठी त्यांची आई (कमल पद्माकर धोपाडे) यांना विशेष महत्त्व आहे. जीवनात ८३ वर्षांचा कालखंड पूर्ण केल्यानंतरही आईचा उत्साह व आत्मविश्वास नव्या पिढीच्या कुठल्याही युवा सदस्यासाठी प्रेरणास्रोत ठरू शकतो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या कमल यांना खेळाची विशेष आवड आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये शिक्षकाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी किमान सुविधांमध्ये बालकांना खेळामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. आपल्या कार्यकाळाची आठवण करताना त्या म्हणतात,‘जीवनात खेळाला विशेष महत्त्व आहे. त्याकडे डोळेझाक करता येणार नाही. मी आजही योगासोबत जुळलेली आहे. खेळासोबत जुळलेली असल्यामुळे वाढत्या वयातही मी सर्वप्रकारच्या कार्यात सहभागी होत असते. शैलजाने कुटुंबाला नवी ओळख दिली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण आहे, संघर्ष करण्याची वृत्ती.’