शैलेश देशभ्रतार खून प्रकरण : आरोपींना २७ पर्यंत कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 09:43 PM2020-10-23T21:43:23+5:302020-10-23T21:44:49+5:30
Shailesh Deshbhratar murder case, Crime News, Nagpur जीवे मारण्याची धमकी देणारा गुन्हेगार शैलेश देशभ्रतारच्या खुनातील आरोपींची कपिलनगर पोलिसांनी २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीवे मारण्याची धमकी देणारा गुन्हेगार शैलेश देशभ्रतारच्या खुनातील आरोपींची कपिलनगर पोलिसांनी २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.
चार दिवसात दोन खून आणि एक खुनाचा प्रयत्न झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कपिलनगर ठाण्याच्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवारी दुपारी आवळेनगरात राकेश पटेल (३२) याने शैलेश देशभ्रतारचा दगडाने ठेचून खून केला होता. शैलेश विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची एक वर्षांपासून राकेश सोबत मैत्री होती. घटनेच्या वेळी दोघांनीही मद्य प्राशन केले होते. दरम्यान त्यांच्यात वाद झाला. शैलेश त्याला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे रागाच्या भरात राकेशने त्याचा खून केला. शैलेश नागरिकांना मारहाण करीत होता. तो रागीट स्वभावाचा होता. त्याने धमकी दिल्यामुळे राकेशचा राग अनावर झाला. त्याने शैलेश आपल्याला मारून टाकेल या भीतीमुळे शैलेशचा खून केला. पोलिसांनी आज राकेशला न्यायालयासमोर हजर करून २७ ऑक्टोबरपर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळविली. कपिलनगरात मागील चार दिवसात ही दुसरी खुनाची घटना आहे. रविवारी रात्री तडीपार दीपक ऊर्फ गोलु राजपूतचा त्याचा साथीदार तुषार गजभिये आणि प्रेमचंद ऊर्फ टोनी मारोतकरने खुन केला होता. तुषारने त्याच्या बहिणीला त्रास देत असल्यामुळे गोलूचा खुन केल्याचे सांगितले. परंतु परिसरात वर्चस्वातून टोळीयुद्ध सुरु असल्याची माहिती आहे. गोलूचा परिसरात दबदबा होता. त्याचे वर्चस्व संपविण्यासाठी आरोपींनी गोलूचा खून केला. आता आरोपी बहिणीला त्रास दिल्यामुळे त्याचा खून केल्याचे सांगत आहेत. बुधवारी रात्रीही आरोपींनी एका युवकावर हल्ला केला. काही दिवसांपासून कपिलनगरात आरोपींच्या कारवाया वाढल्या आहेत. ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकारी संपत्तीचे वाद मिटविण्यात व्यस्त आहेत. हे अधिकारी यापूर्वीही अनेक प्रकरणात गंभीर नसल्यामुळे चर्चेत होते.