शालीमार एक्सप्रेस रुळावरून घसरली; नागपुरात मोठा अपघात टळला
By नरेश डोंगरे | Published: October 22, 2024 07:00 PM2024-10-22T19:00:23+5:302024-10-22T19:01:36+5:30
कळमना यार्डातील घटना : प्रवासी गोंधळले; मात्र कुणालाही दुखापत नाही
नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर स्थानकावरून गोंदियाकडे निघालेल्या शालीमार एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. कळमना यार्डाजवळ मंगळवारी दुपारी ही घटना घडली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला आणि कोणत्याही प्रकारची जिवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही.
ट्रेन नंबर १८०२९ शालीमार एक्सप्रेस नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी मुंबईहून नागपूरला पोहचली. थांब्यानंतर ती नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकावरून गोंदियाकडे जायला निघाली. कळमना यार्डाकडे जात असताना दुपारी २.५ च्या सुमारास अचानक ट्रेनच्या इंजिनपासूनचा तिसरा कोच (पार्सल कोच) तसेच स्लिपर कोच नंबर एस-२ रुळावरून खाली घसरले. त्यामुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला. काही तरी वेगळे घडल्याचे लक्षात आल्याने प्रवासी गोंधळले आणि आरडाओरड करू लागले. दरम्यान, ट्रेन मॅनेजरकडून रेल्वे कंट्रोलला शालीमार रुळावरून खाली घसरल्याची माहिती मिळाल्याने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनात खळबळ निर्माण झाली. विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी, अप्पर व्यवस्थापक एस.पी. चंद्रीकापूरे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीपसिंग यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वीच मदत कार्य करणारे रेल्वे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत घटनास्थळी पोहचले होते.
दरम्यान, अपघातग्रस्त कोच बाजुला करून रुळ दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. सायंकाळी ६.३५ पर्यंत मदतकार्य सुरूच होते. गाडीला दुसरे कोच जोडल्यानंतर रात्री ७.३० नंतरच शालीमार एक्सप्रेस पुढच्या प्रवासाला निघणार असल्याचे अधिकारी सांगत होते.
कुणालाही दुखापत नाही
सुदैवाने गाडीचा वेग फारच कमी होता. त्यामुळे एक मोठा अपघात टळला. गाडीचा अपघात झाला असला तरी कुणालाही फारशी दुखापत झाले नसल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी दपूम रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानक, गोंदया, डोंगरगड तसेच राजनांदगाव स्थानकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे अधिकारी सांगत होते.
अनेक गाड्यांचे सुरक्षित अंतरावर
अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेन नंबर १२९९४ पुरी गांधीधाम एक्सप्रेस, ट्रेन नंबर १२१०६ विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस, ट्रेन नंबर २०८२३ पुरी अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस, ट्रेन नंबर ११७५३ ईतवारी रिवा स्पेशल, ट्रेन नंबर ०८७४४ ईतवारी गोंदिया मेमू स्पेशल नागपूरपासून सुरक्षित अंतरावर थांबविण्यात आल्या. या सर्व गाड्यांचे वेळापत्रक त्यामुळे बिघडले. तर, ट्रेन नंबर ११०३९ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ईतवारी ऐवजी कळमना मार्गे चालविण्यात आली.