नागपुरात निद्रिस्त महिलेसोबत लज्जास्पद वर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:10 AM2018-05-18T00:10:06+5:302018-05-18T00:10:38+5:30
प्रवासादरम्यान एका निद्रिस्त महिला (वय २५) प्रवाशासोबत लज्जास्पद वर्तन करून खासगी बसचालकाने तिचा विनयभंग केला. बुधवारी रात्री धावत्या बसमध्ये ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवासादरम्यान एका निद्रिस्त महिला (वय २५) प्रवाशासोबत लज्जास्पद वर्तन करून खासगी बसचालकाने तिचा विनयभंग केला. बुधवारी रात्री धावत्या बसमध्ये ही घटना घडली.
पीडित महिलेचे नुकतेच लग्न झाले. ती पुण्याला राहते. तिचे माहेर नागपुरात आहे. बुधवारी रात्री ती माहेरी येण्यासाठी खासगी बसमध्ये (स्लीपर कोच) बसली. तिच्या बाजूला दोन सीटच्या मध्ये रिकाम्या जागेत आरोपी बसचालक मध्यरात्री झोपला. धावत्या बसमध्ये त्याने निद्रिस्त महिलेशी लज्जास्पद वर्तन केले. तिने आरडाओरड करून सहप्रवाशांना ही माहिती दिली. त्यानंतर आपल्या माहेरच्यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी पहाटेचे ५ वाजले होते. माहेरच्यांनी अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना बस रविनगर चौकात थांबविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बस थांबवून आरोपी बसचालक बाबाराज ज्योतप्पा पाटील (वय ३४) याला ताब्यात घेतले. तो कर्नाटकमधील सोलापूर, हुक्केरी, जि. बेळगाव येथील रहिवासी आहे. महिलेची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी कर्नाटकमधील बसचालक पाटील याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.