भक्तांची मनाेकामना पूर्ण करणारा आदासाचा शमी विघ्नेश्वर; गणेशोत्सवात उसळला जनसागर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 11:16 AM2023-09-22T11:16:59+5:302023-09-22T11:19:09+5:30

मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून शमी विघ्नेश्वरावर भाविकांची असीम श्रद्धा

Shami Vigneshwar of Adasa who fulfills the desires of the devotees; A sea of people surged during Ganeshotsav | भक्तांची मनाेकामना पूर्ण करणारा आदासाचा शमी विघ्नेश्वर; गणेशोत्सवात उसळला जनसागर

भक्तांची मनाेकामना पूर्ण करणारा आदासाचा शमी विघ्नेश्वर; गणेशोत्सवात उसळला जनसागर

googlenewsNext

नागपूर : विदर्भातील अष्टविनायकांपैकी मानाचा गणपती म्हणजे श्रीक्षेत्र आदासा येथील शमी विघ्नेश्वर. वामन अवतारात भगवान विष्णूने या मूर्तीची स्थापना केल्याचे मानले जाते. नागपूरहून ४० किलोमीटर तर श्रीक्षेत्र धापेवाडा येथून ४ किलोमीटरवर आदासा हे छोटेसे गाव वसलेले आहे. मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून शमी विघ्नेश्वरावर भाविकांची असीम श्रद्धा आहे. गणेशोत्सवानिमित्त आदासा येथे शमी विघ्नेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला आहे. मंदिर परिसरात लक्ष वेधणारी आकर्षक रोषणाईही करण्यात आली आहे.

पुजारी वैभव जोशी व मधुर भाले यांनी सांगितले, पुराणातील उल्लेखाप्रमाणे या ठिकाणाचे नाव अदोषक्षेत्र. बोलीभाषेत त्याचा अपभ्रंश होऊन पुढे आदासा असे नाव पडले. गणपती देवस्थानाचा परिसर २० एकरांत आहे. मंदिराच्या वरील भागाला दुर्गादेवीचे मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, कालभैरव मंदिर, जंबुमाळी मारुती ही देवस्थाने आहेत. त्याचबरोबर महारुद्र हनुमानाचे मोठे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याशी बाहुली विहीर असून रस्त्याच्या पलीकडे गणेश कुंड आहे. पूर्वी गणपतीच्या आंघोळीसाठी या गणेश कुंडातून पाणी नेले जात होते, असे सांगितले जाते.

अशी आहे आख्यायिका...

आख्यायिकेनुसार इंद्राचे स्थान प्राप्त करून स्वर्गावर आधिपत्य निर्माण करण्यासाठी गुरु शुक्राचार्यांनी बळीराजाला १०० अश्वमेध यज्ञ करायला सांगितले. बळीराजाला यज्ञ करण्यास रोखण्यासाठी भगवान विष्णूने देवमाता अदितीच्या गर्भातून वामन अवतारात जन्म घेतला. त्यानंतर वामन अवतारातील भगवान विष्णूने याच ठिकाणी शमी वृक्षाखाली आदासा येथे गणेशाची उपासना केली. उपासनेने प्रसन्न होऊन गणेशाने शमी वृक्षातून प्रगट होत विष्णूला आशीर्वाद दिला. सूर-असुरांच्या युद्धात देवांचा विजय झाल्यानंतर हनुमान येथे विश्रांतीसाठी आले होते, अशीही आख्यायिका आहे.

पाच हजार वर्षे जुने मंदिर...

मंदिराच्या वरच्या बाजूला एक भुयार असून तेथे महादेवाची पिंड आहे. या भुयारातून एक गुप्त मार्ग असून तो नागद्वार व रामटेकपर्यंत गेला असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे बांधकाम जवळपास ५ हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते. अकरा फूट उंच व सात फूट रुंद असलेली येथील गणेशाची मूर्ती भक्तांचे संकट दूर करत असल्याने वर्षभर येथे मोठी गर्दी असते. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, त्यावरील शिल्पकला, उंच कळस, फुलांची बाग, सभागृह असल्याने पर्यटकांचीही येथे वर्षभर गर्दी असते.

Web Title: Shami Vigneshwar of Adasa who fulfills the desires of the devotees; A sea of people surged during Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.