शंकरबाबाच्या अनिलचे मेडिकलने घेतले पालकत्व
By Admin | Published: March 20, 2016 02:59 AM2016-03-20T02:59:25+5:302016-03-20T02:59:25+5:30
मेडिकलमध्ये सहा दिवसांच्या उपचारानंतर शंकरबाबा पापळकर यांच्या अनिलला शनिवारी सुटी होणार होती. सुटीचे सर्व सोपस्कार पार पडले होते.
राजकुमार बडोले यांनी दिली भेट : आणखी आठ दिवस चालणार उपचार
नागपूर : मेडिकलमध्ये सहा दिवसांच्या उपचारानंतर शंकरबाबा पापळकर यांच्या अनिलला शनिवारी सुटी होणार होती. सुटीचे सर्व सोपस्कार पार पडले होते. विभागप्रमुख डॉ. वृंदा सहस्रभोजनी यांनी त्याला तपासले. आणखी आठ दिवस ठेवता येईल का, अशी विचारणा शंकरबाबाकडे केली. पोराला आणखी औषधोपचाराची गरज आहे, आश्रमात ती सोय उपलब्ध होणार नाही, अशी विनंती करताच बाबा गहिवरले. मतिमंद बेवारस अनिलचे मेडिकलने घेतलेले पालकत्व आणि त्याला मिळत असलेली माया पाहून बाबांसोबतच सर्व उपस्थितांचे डोळे भरून आले होते.
विशेष म्हणजे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत मेडिकलमध्ये अनिलला भेटले. त्याला आपल्या हातून मिठाई भरवली.
ज्यांना स्वत:ची ओळख नाही, नाव नाही अशांना स्वत:चं नाव आणि पित्याचं प्रेम देऊन आधार बनणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला काय म्हणावं? एक-दोन नव्हे तर तब्बल १२५ अनाथ, अपंग मुलांचे पिता झालेले शंकरबाबा पापळकर यांच्या पितृत्वाला म्हणूनच सलाम केला जातो. त्याच बाबाचे एक पोर अनिल मेडिकलमध्ये १४ मार्चपासून उपचार घेत आहे. एक महिन्याचा असताना मुंबईच्या पेडर रोडवर फेकलेल्या अवस्थेत अनिल आढळून आला होता. तेव्हापासून तो बाबाच्या सोबत आहे. मतिमंद असल्याने तो गेली १६ वर्षे खाटेवरच आहे. त्याला खांद्यावर बसवून दुनिया दाखवणारा बाबा त्याच्या प्रकृतीला घेऊन मात्र सहा दिवसांपासून बेचैन होते. मेडिकलच्या २६ क्रमांकाच्या वॉर्डात त्याच्यावर उपचार सुरू होता. डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी एवढेच नव्हे तर वॉर्डातील रुग्ण आणि त्याचे नातेवाईक सर्वच त्याचे मित्र झाले होते. शनिवारी त्याला सुटी होणार या जाणिवेने या सर्वांमध्ये आनंदही होता आणि आता तो भेटणार नाही म्हणून दु:खही होते. परंतु डॉ. सहस्रभोजनी यांनी आणखी काही दिवस त्याला आपल्याकडे ठेवून घेतल्याने वॉर्डात पुन्हा आनंदाचे वातावरण पसरले. सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी अनिलला भेट दिली त्यावेळी शंकरबाबा पापळकर, प्रा. संजय नाथे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, औषध वैद्यकशास्त्रविभागाचे विभाग प्रमुख डॉ. वृंदा सहस्रभोजनी, डॉ. विनय पंचलवार आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
नियमाबाहेर जाऊन मदत
हे शासकीय रुग्णालय असले तरी अनिलला नियमाबाहेर जाऊन मदत केली जात आहे. प्रत्येक जण आपल्यापरीने त्याला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या उपचारासाठी डॉक्टरांपासून ते कर्मचारी सर्वच एक कुटुंब झाले आहे.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.