स्पेशल स्टोरी: बुद्धिमत्तेच्या बळावर युरोपच्या प्रतिष्ठित फेलोशिपसाठी शंतनूने घेतली गगनभरारी
By नरेश डोंगरे | Updated: December 31, 2024 19:25 IST2024-12-31T19:24:51+5:302024-12-31T19:25:09+5:30
जगातील १२ विद्यार्थ्यांमध्ये मिळवले स्थान : निवड झालेला भारतातील एकमात्र विद्यार्थी.

स्पेशल स्टोरी: बुद्धिमत्तेच्या बळावर युरोपच्या प्रतिष्ठित फेलोशिपसाठी शंतनूने घेतली गगनभरारी
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सैनिक असलेल्या आजोबाचे बोट धरून लहानपणी गावातल्या काळ्या मातीत रमणारा शंतून पहिल्या वर्गापासूनच अचाट बुद्धीमतेचे प्रदर्शन करीत होता. मोठे होता होता त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता चांगलीच लखलखली अन् पदवी घेताच बुद्धिमत्तेच्या बळावर शंतनूने गगनभरारी घेतली. युरोपियन संघातर्फे दरवर्षी जगातील १२ गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित फेलोशिपकरिता गांधी (वर्धा) जिल्ह्यातील शंतनूची निवड झाली. नोबेल प्राइज विजेत्या 'मेरी क्युरी' यांच्या नावाने जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी ही फेलोशिप देण्यात येते, हे विशेष!
शंतनू अशोक राऊत असे त्याचे पूर्ण नाव असून, तो देवळी (जि. वर्धा) येथील रहिवासी आहे. शंतनूचे आजोबा दादाजी राऊत स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते. वडील अशोक राऊत अभियंता असून आई सुनीता गृहिणी आहे. काैटुंबिक स्थिती सर्वसाधारण आहे. शाळेत पाऊल ठेवताच शंतनूने ‘बाळाचे पाय पाळण्यात’ची म्हण सार्थ ठरवली. प्राथमिक शिक्षणानंतर ८ वी पासून १२ वी पर्यंत त्याला आई-वडिलांनी आंध्र प्रदेशातील उथ्थुरू, विजयवाडा येथे शिकविले. त्यानंतर त्याने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात आर्किटेक्चरची डिग्री मिळवली.
इटलीच्या सुप्रसिद्ध युनिव्हर्सिटी ऑफ बोलोनिया विद्यापीठामार्फत दरवर्षी जगभरातील युवा संशोधक - विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फेलोशिप देण्यात येते. भारतीय चलनानुसार दरवर्षी ६० लाख (तीन वर्षांचे एकूण १ कोटी, ८० लाख) रुपये निवड झालेल्या विद्यार्थ्याला संशोधन-शिक्षणासाठी मिळतात. त्यासाठी जगभरातून शेकडो विद्यार्थी आवेदन करतात. यावर्षीही तसेच झाले. मात्र, बोलोनिया विद्यापीठाने शेकडो विद्यार्थ्यांमधून केवळ १२ जणांची निवड केली. त्यात शंतनू राऊतचाही समावेश आहे.
भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी
शंतनूच्या यशाची ही गगनभरारी देशपातळीवर काैतुकाचा विषय ठरली आहे. कारण, अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या युरोपच्या या 'मेरी स्क्लोडोव्स्का-क्युरी' फेलोशिपसाठी निवड झालेला शंतनू भारतातील एकमात्र विद्यार्थी-संशोधक ठरला आहे. ‘शहरांमधील नैसर्गिक वातावरणाचे संतुलन राखण्यासाठी’ शंतनू इटलीत संशोधन करीत आहे. त्याची ही निवड असंख्य भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी.